२०१६ साल दीडपटीहून अधिक वाढीचे राहण्याचे कयास
ऑनलाइन खरेदीचा ग्राहकांमधील वाढता सोस पाहता, देशातील ई-कॉमर्सची बाजारपेठ २०१६ सालाअखेर ३८ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात सुमारे अडीच लाख कोटी रुपयांच्या उलाढालीला गाठेल, असा या उद्योग क्षेत्राबाबत आशादायी कयास ‘अ‍ॅसोचॅम’ या उद्योग संघटनेने व्यक्त केला आहे. चालू वर्षांत उलाढालीत २३ अब्ज डॉलरची भर पडेल, म्हणजे सध्याच्या तुलनेत दीडपटीने वाढ होणे अंदाजण्यात आले आहे.
ई-कॉमर्स संकेतस्थळांवर खरेदीवर मोठमोठय़ा व एकास एक वरचढ सवलती हे ग्राहकांसाठी मोठे आकर्षणाचे ठरले आहे. त्याचप्रमाणे इंटरनेट आणि स्मार्ट फोनचा वाढता वापर, खरेदी विनिमय ऑनलाइन करण्याबाबत ग्राहकांमधील वाढता विश्वास या बाबी ई-पेठेच्या बरकतीला कारणीभूत ठरत असल्याचे अ‍ॅसोचॅमच्या पाहणीने म्हटले आहे.
ऑनलाइन खरेदी व्ययात मुंबई पहिल्या स्थानावर, त्या खालोखाल दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू आणि कोलकाता अशी क्रमवारी या पाहणी अहवालात लावली गेली आहे. ई-कॉमर्सच्या बरोबरीने मोबाइल कॉमर्सकडे लोकांचा ओढा प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचा तिचा निष्कर्ष आहे. २०१३ मधील ४६ टक्क्यांच्या तुलनेत सरलेल्या २०१५ सालात ७८ विनिमय हा मोबाइलच्या वापरात झाला आहे, असे अ‍ॅसोचॅमचे महासचिव डी. एस. रावत यांनी सांगितले.
ऑनलाइन खरेदीचा शिरस्ता
ई-कॉमर्स संकेतस्थळावर मोबाइल फोन हा सर्वाधिक विकला जाणारा जिन्नस आजवर होता. परंतु २०१५ सालातील प्रत्येक १०० वस्तूंच्या खरेदीत जवळपास ७० वस्तू या वस्त्रपरिधान व फॅशन्सशी संलग्न आहेत.

उत्पादने २०१५ मधील वाढ %
* तयार वस्त्रे ६९.५
*इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स ६२
* बाळांची निगा उत्पादने ५३
* सौंदर्यनिगा उत्पादने ५२
* होम फर्निशिंग- ४९
संदर्भ: ‘अ‍ॅसोचॅम’ची पाहणी

ग्राहकांचा वयोगट
१८ ते २५ वर्षे ३८
२६ ते ३५ वर्षे ५२
३६ ते ४५ वर्षे ८
४५ ते ६० वर्षे २
सर्व वयोगटांत महिला ग्राहकांचे प्रमाण ३५ टक्के आहे.

ग्राहकांकडून विनिमय कसा?
* कॅश ऑन डिलिव्हरी ४५%
* क्रेडिट कार्ड- १६%
* डेबीट कार्ड- २१%