एसकेएस मायक्रोफायनान्स लिमिटेडने कर्जदारांना आकारले जाणाऱ्या व्याजात एक टक्का दर करात करत हा दर आधीच्या २०.७५ टक्क्य़ांवरून १९.७५ टक्क्य़ांवर आणून ठेवला आहे. नवे व्याजदर हे येत्या ७ डिसेंबरपासून नव्या सर्व कर्जवितरणांना लागू होणार आहेत. या कपातीमुळे मूलभूत ‘इन्कम जनरेटिंग लोन्स’वर (आयजीएल) सब-२०% व्याजदर आकारणारी ही पहिली सूक्ष्मवित्त संस्था ठरली आहे. १९.७५ व्याजदर कोणत्याही खासगी एमएफआयने आकारलेल्या व्याजदरांमध्ये सर्वात कमी असल्याचा दावा केला गेला आहे.

कंपनीने ऑक्टोबर २०१४ पासून जाहीर केलेली ही चौथी व सरासरी ४.८ व्याजदर कपात आहे. कर्जावरील खर्चात झालेली घट व मोठय़ा प्रमाणाचा लाभ हा कर्जदारांना देण्याच्या कंपनीच्या धोरणानुसार ही दर कपात लागू करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेली देशातील एसकेएस ही पहिल्या सूक्ष्मवित्त संस्थेने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढ व कर्जावरील खर्चामध्ये घट नोंदविली आहे. आंध्र प्रदेशातील बिकट सूक्ष्म वित्त पुरवठा स्थितीत कंपनीने कर्ज पुनर्बाधणीमध्ये सहभाग घेण्याचे टाळले. कर्ज खात्याने ५,४३४ कोटी रुपयांचा टप्पा पार केला. सप्टेंबर २०१५ अखेरच्या तिमाहीत कंपनीने भांडवल पर्याप्तता प्रमाण २४.६ टक्के राखले आहे.