सक्तवसुली संचालनालयाकडून छापे सुरूच; सीबीआयकडून आणखी दोन गुन्हे दाखल

पंजाब नॅशनल बँकेच्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्यांचे नातेवाईक प्रवर्तक मेहूल चोक्सी या दोघांविरुद्ध शुक्रवारी समन्स जारी केले. आठवडय़ाभरात त्यांना चौकशीसाठी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. या दोघांचेही पासपोर्ट रद्द करण्याबाबतही संचालनालयाने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.

काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात मोदी आणि चोक्सी यांनी परदेशात पोबारा केल्याची संचालनालयाची माहिती आहे. प्राथमिक चौकशीनंतर या दोघांवर प्रक्रियेप्रमाणे समन्स बजावण्यात आली. ही समन्स नीरव मोदी यांच्या कंपनीच्या संचालकांकडे सुपूर्द करण्यात आली. या समन्सनुसार ते हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कारवाई केली जाईल, असे या सूत्रांनी सांगितले.

सीबीआयने दाखल केलेल्या प्राथमिक निष्कर्ष अहवालाच्या (एफआयआर) आधारे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अगोदरच लूक आऊट नोटिस जारी केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने शुक्रवारी घोटाळ्याच्या आणखी दोन तक्रारी सीबीआयकडे दाखल केल्या. या प्रकरणीही सीबीआयने आणखी दोन गुन्ह्य़ांची नव्याने नोंद केली आहे.

सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी १७ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यानंतर सहा मालमत्ता सील करण्यात आल्या. सील करण्यात आलेल्या मालमत्तांची शुक्रवारी पुन्हा तपासणी करण्यात आली. गुरुवारी टाकलेल्या छाप्याच्या ठिकाणी संचालनालयाने शुक्रवारी पुन्हा छापे टाकले. आणखी काही मालमत्ता सील केल्याचे कळते.

दरम्यान, नीरव मोदी यांच्यावर ५०० कोटींचा प्राप्तीकर ठकविल्याप्रकरणी गेल्या वर्षी प्राप्तीकर कार्यालयाने छापे टाकले होते. हा तपशीलही संचालनालयाने मिळविला आहे. या प्रकरणीही आता स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. शुक्रवारी नव्याने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँकेसह इतर बँकेशी झालेल्या व्यवहाराचीही माहिती मिळाल्याचे संचालनालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

तब्बल १४ बँकांकडून अशा रीतीने फायदा उठविण्यात आला आहे. या बँकांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, अलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक, विजया बँक, आंध्र बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, पीएनबी इन्व्हेस्टमेंट सव्‍‌र्हिसेस, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आदींचा समावेश असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्य़ात गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज खरात या पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश असला तरी प्रत्यक्षात बँकेने दहा अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. शेट्टी आणि खरात या दोघांची सीबीआयने चौकशी केली आहे. सक्तवसुली संचालनालयाकडूनही या दोघांना चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. त्यानंतर आणखी काही बँक अधिकाऱ्यांचा संबंध आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, अशी माहितीही या सूत्रांनी दिली.

२०११ ते २०१७ या काळात झालेल्या या घोटाळ्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेच्या लेखापरीक्षकांनी दुर्लक्ष का केले याचीही चौकशी केली जाणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

चोक्सीसह दहा संचालकांविरुद्धही गुन्हे

पंजाब नॅशनल बँकेने नव्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत सीबीआयकडे दाखल झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये ४८८६ कोटींचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सीबीआयने शुक्रवारी मेहूल चोक्सी याच्यासह मे. डायमंड आर यूएस, मे. सोलर एक्स्पोर्ट आणि मे. स्टेलार डायमंड या तीन कंपन्यांमधील दहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएनबी-गीतांजली संबंधातील व्यवहारांची सेबीकडून चौकशी

पंजाब नॅशनल बँक तसेच गीतांजली जेम्स यांच्यामार्फत होणाऱ्या समभाग तसेच अन्य व्यवहारांची चौकशी करण्याची तयारी भांडवली बाजार नियामक सेबीने सुरू केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने यापूर्वी सेबीच्या सहमतीने २०१३ मध्ये गीतांजली जेम्स तसेच तिचे प्रवर्तक मेहुल चोक्सी यांची चौकशी केली होती.

लेखा परिक्षकांची भूमिका पाहणार – लेखापाल संघटना

बँका, कंपन्यांचे लेखा परिक्षण करणाऱ्या सनदी लेखापालांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘आयसीएआय’ने पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात लेखा परिक्षकांची भूमिका तपासण्याची तयारी दर्शविली आहे. संघटना याबाबत तपास यंत्रणा, बँक तसेच संबंधितांकडून माहिती मिळवित असून संघटनेने स्थापन केलेल्या वित्तयी अहवाल आढावा मंडळाच्या सूचनेनुसार या प्रकरणात लक्ष घातले जाईल, असे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष नवीन गुप्ता यांनी सांगितले.

घोटाळेबहाद्दरांना कठोर शिक्षा करा – असोचॅम

पीएनबी प्रकरणात कोटय़वधींचा घोटाळा करणाऱ्या व्यक्ती तसेच कंपन्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा खुद्द उद्योग संघटनांमधून होत आहे. असोचॅमचे महासचिव डी. एस. रावत यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात दोषी असलेल्या कंपन्यांवरही कठोर कारवाई व्हायला हवी. ‘सीआयआय’च्या अध्यक्षा शोभना कामिनेनी यांनीही बँक क्षेत्रात ठोस व योग्य व्यवस्था आणण्याचा आग्रह धरला आहे. व्यवसाय करतानाही नैतिक मूल्ये जपण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.