केंद्र सरकारची डबघाईला आलेल्या राज्य वीज वितरण कंपन्यांना उभारी देणारी ‘उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना (उदय)’ची यशस्वी अंमलबजावणी ही मंदावलेल्या मागणीने ग्रस्त देशांतर्गत देशातील विद्युत उपकरण निर्मात्या उद्योगांची बहुतांश भिस्त अवलंबून आहे, असे या उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ईमा’ या संघटनेने स्पष्ट केले.
‘उदय’ची जोरकस अंमलबजावणी होऊन वीज वितरण कंपन्यांच्या वित्तीय स्थितीचा कायापालट खूपच सकारात्मक ठरेल, असे ईमाचे अध्यक्ष बाबू बॅबेल यांनी ‘इलेक्रामा २०१६’ या प्रदर्शन व परिषदेची घोषणा करण्यानिमित्त बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. ही चार दिवसीय परिषद येत्या १३ ते १७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान बंगळुरू येथे होत आहे.
विजेचे वितरणादरम्यान होणारे नुकसान लक्षणीय कमी करण्यात यशस्वी ठरलेल्या महाराष्ट्रात वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक स्वास्थ्य सुधारणे नितांत आवश्यक आहे.
तंत्रज्ञानात्मक नावीन्यता आणि पायाभूत सोयीसुविधा अद्ययावत केल्यास, राज्याला नवीन प्रकल्पात गुंतवणूक न करता स्थापित क्षमतेत १६,५०० मेगाव्ॉट इतकी भर सहज शक्य आहे, असे बाबू बॅबेल यांनी सांगितले.