20 November 2019

News Flash

‘अवजड उद्योगात सक्षमीकरणाद्वारे रोजगारनिर्मिती’

नावीन्यतेची जोड देऊन ‘आवडत्या उद्योगा’त रुपांतर करणार

अरविंद सावंत

नावीन्यतेची जोड देऊन ‘आवडत्या उद्योगा’त रुपांतर करणार – अरविंद सावंत

सरकारी उद्योगांमध्ये नवसंकल्पना राबवून अवजड उद्योगांचे सक्षमीकरण करणे व त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याला माझे प्राधान्य असेल, असे नवनियुक्त केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सरकारी उद्योगांना नावीन्यतेची व आधुनिकतेची जोड दिल्यास अवजड उद्योगाचे ‘आवडत्या उद्योगात’ रुपांतर करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासाठी प्रसंगी काही धाडसी निर्णयही घ्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंत यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या अख्यत्यारितील अवजड उद्योग विभाग हे एक आव्हान असून ते सक्षमपणे पेलण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिल. यासाठी माझ्या खात्याअंतर्गत येणाऱ्या देशभरातील उद्योगांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून सध्या सुरु असलेले उद्योग कसे अधिक प्रभावीपणे काम करतील; तसेच जे उद्योग बंद पडले आहेत त्यातील कोणत्या उद्योगांचे पुनरुज्जीवन करता येईल याचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल.

अरविंद सावंत यांनी सांगितले की, कोणताही उद्योग हा कामगारांमुळे नव्हे तर तर योग्य व्यवस्थापन व नियोजनाअभावी अडचणीत येतो. यापूर्वी या क्षेत्रात काम केले असल्याने कामगार प्रतिनिधी व नेता म्हणून कामगारांची बाजूही मला माहित आहे. नोकरशाहीने धाडसी निर्णय घेतल्यास अनेक प्रश्न यापूर्वीही सुटू शकले असते. बंद पडलेल्या कारखान्यांना मी भेट देणार आहे. त्यासाठी संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनाही विश्वासात घेऊन बंद कारखाने सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सार्वजनिक क्षेत्रात तोटा होण्यामागे अनेक कारणे असतात. नव्या संकल्पना राबविल्या तर अवजड उद्योग सक्षम करता येईल. या क्षेत्रात रोजगारनिर्मितीला वाव असून आगामी काळात या खात्याला एक चांगले स्वरूप मिळेल, असे ते म्हणाले.

First Published on June 4, 2019 1:14 am

Web Title: empowerment in the heavy industry arvind sawant
Just Now!
X