22 October 2020

News Flash

उद्यमशील, उद्य‘मी’ : प्रोपगंडा -सावधान!

प्रोपगंडा वस्तू विकण्यासाठी, निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी किंवा धार्मिकविचारांसाठीही होऊ शकतो

(संग्रहित छायाचित्र)

मकरंद जोशी

माणसाच्या भावनेतून विचार आणि विचारातून कृती निर्माण होते. मनातील भावना आणि विचार काही विषयांच्या ‘प्रोपगंडा’तून उत्तेजित होऊ शकतात. आणि सतत आपल्या डोक्यावर एखादी गोष्ट आदळली किंवा रोज एखादी गोष्ट आपल्या कानावर पडली की आपला त्याच्यावर विश्वास बसतो. प्रोपगंडा वस्तू विकण्यासाठी, निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी किंवा धार्मिकविचारांसाठीही होऊ शकतो. एका उद्योजकाच्या दृष्टीनेदेखील कितीतरी असे विचार त्याच्या मनाने खरे मानलेले असतात आणि उद्योजक त्या विचारावर विसंबून निर्णय घेत असतो. अशाच काही ठरावीक मराठी प्रोपगंडा झालेल्या विचारांना विचारात घेऊ या.

* स्वावलंबन: लहानपणापासून आपल्या मराठी मनावर स्वावलंबनाचे संस्कार झालेले असतात आणि स्वत:च्या कामांसाठी आपण स्वयंसिद्ध असावे असा हा विचार मराठी माणसाच्या नसानसात भिनलेला असतो. मला काही असे उद्योजक माहीत आहेत कीते कुणालाही पैसे देताना स्वत: चेक लिहिणे पसंत करतात. आता उद्योजक जर अकाऊंटंटचं काम करायला लागला तर उद्योजकाचे काम कोण करणार? कितीतरी उद्योजकांना स्वत: सगळं काम केल्याशिवाय समाधान मिळत नाही. दुसऱ्या कुणाचंच काम पसंत पडत नाही आणि अशारीतीने स्वावलंबनापासून सुरू झालेला प्रवास कधी कधी आत्ममग्नतेत अडकून पडतो. त्याचप्रमाणे delegation without monitoring is dangerous. कुठल्याही एका गोष्टीचा अतिरेक जो टाळतो तो यशस्वी होतो.

* अंथरुण पाहून पाय पसरावे विरुद्ध उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा:  पारंपरिकपणे मराठी माणूस अंथरुण पाहून पाय पसरावे अशा वृत्तीने आपल्या उद्योगवाढीसाठी कर्ज घेण्याबाबतीत खूपच उदासीन राहिलेला दिसतो. या विरुद्ध काही दिवसांपूर्वी एक टीव्ही चॅनेलवर उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा असा एक कार्यक्रम एक उद्योजक चालवत असे. हे दोन्ही विचार उद्योजकांवर आदळत असतात आणि जे विचार जास्त समोर येतात त्या विचारांवर आपला मेंदू विश्वास ठेवतो. अशा वेळेला दोन्ही विचारांचा आदर, त्या विचारांची ताकद आणि त्या विचारांची मर्यादा दोन्हीचं भान ठेवून जो उद्योजक उभारणी करतो तो अधिक मजबूत होतो. मी कधीही कर्ज घेतच नाही हा विचार उद्योगवाढीसाठी मारक ठरतो, तर मी उद्योग दुसऱ्याच्याच पैशावरच करतो या विचारांच्या उद्योगांची किती वाताहत झाली ते आपण गेल्या दोन-तीन वर्षांत पाहिलं आहे.

*  माझ्या उद्योगात राम नाही? : करोनाकाळात,  बांधकाम, मॉल /रिटेल आणि हॉटेल उद्योग कसा संकटात आहे हे आपण ऐकतो. सतत ही चर्चा ऐकून काही नवं उद्योजक त्या बातम्यांनी विचलित होतात आणि आपला उद्योग सोडून दुसरा उद्योग चालू करण्याचा प्रयत्न करतात, तर याच क्षेत्रातले दुसरे मोठे उद्योजक छोटय़ा उद्योगांना गिळंकृत करायला संधी शोधतात. गमतीचा भाग बघितला तर गेल्या ५-६ महिन्यांत रिलायन्सने एकाच वेळी आपल्या जिओ या डिजिटल उद्योगात निधी उभारणी केली आणि याच दरम्यान फ्युचर हा किराणामधील मोठा उद्योग गिळंकृत केला. जर मॉलमधील दुकानांना भविष्य नसेल तर रिलायन्सने असे का केलं?

प्रोपगंडा करताना पूर्ण असत्य न सांगता अर्धवट सत्य सांगितलं जातं. अर्धवट सत्य आणि सत्य या मधला फरक समजणं हा उद्योजकाचा प्रवास आहे. या प्रवासासाठी आणि सजगतेसाठी शुभेच्छा!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:21 am

Web Title: entrepreneur article on propaganda beware abn 97
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’ची सलग आठव्या सत्रात दौड
2 औद्योगिक उत्पादन दर ऑगस्टमध्ये उणे ८ टक्के; महागाई दराचा आठ महिन्यांचा उच्चांकी सूर
3 ‘गूगल’विरोधात मोर्चेबांधणी
Just Now!
X