मकरंद जोशी

‘‘माझ्यावर अगदी आकाश जरी कोसळलं तरी निराश न होता माझ्या उद्दिष्टासाठी मी त्या कोसळलेल्या आकाशाचा उपयोग करीन,’’ हे उद्गार आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे. फेब्रुवारी १९१९ साली म्हणजे वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत. लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षांनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. एक उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडून आजच्या करोनाकाळात काय शिकू शकतो, याबद्दल मी माझं मनोगत येथे व्यक्त करणार आहे.

१) ४ महिन्यांची टाळेबंदी विरुद्ध ९ वर्षांची कैद : टिळक त्यांच्या ६४ वर्षांच्या आयुष्यात अनेक वेळेला कारागृहात गेले. आयुष्यातली त्यांची जवळपास ९ वर्षे कारागृहात गेली (स्वाभाविकपणे हे सर्व देशहितासाठी होते). आज गेले ४ महिने आपण सर्व जण टाळेबंदीमुळे त्रासलेले आहोत. त्यांच्यासारख्या कार्यमग्न आणि कर्मयोगी माणसाला कारागृहात राहणे किती कठीण वाटले असेल. परंतु त्यांनी या प्रत्येक शिक्षेचे रूपांतर प्रचंड मोठय़ा कार्यासाठी वापरलेले दिसते. उदा. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची निर्मिती केली. गीतेची शिकवण केवळ वैयक्तिक मोक्षप्राप्ती नसून निष्काम कर्मयोग ही महत्त्वाची शिकवण गीता सांगते, हे भारतीयांच्या मनावर ठसवण्यासाठी आणि उच्च कार्यासाठी भारतीयांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ कारागृहात लिहिला आणि आपला वेळ अत्यंत प्रभावीपणे वापरला. त्याच काळात त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून लिहिले आहे की, आपण व दुर्दैव यांची टक्कर जुंपली आहे. त्यातून कोणीतरी एक हरणार व एक जिंकणार. अर्थात आपण हार न जाण्याचा निश्चय केला तर आपणच जिंकू. हे वाक्य अनेक आर्थिक संकटांत सापडलेल्या तरुणांना/उद्योजकांना उभारी देऊ शकतं. त्यांच्यावर आलेली संकटे पाहिली की आपले आयुष्य बरंच सुकर आहे हे जाणवते आणि त्याचा लढाऊ बाणा प्रेरणा देतो.

२) उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि कटिबद्धता : आपण आरंभलेल्या कार्याच्या उद्दिष्टांबद्दल पूर्ण स्पष्टता आणि कटिबद्धता हा खूप मोठा गुण टिळकांमध्ये ठासून भरला होता आणि उद्योजकाला/तरुणांना हा गुण प्रेरणा देणारा ठरेल. टिळकांना त्यांच्या उद्दिष्टांची किती पराकोटीची स्पष्टता होती हे त्यांच्यावर चालवलेल्या देशद्रोहाच्या खटल्यांवरून येते. या खटल्यांमध्ये बॅ. जिना हे टिळकांची बाजू कोर्टात मांडण्यासाठी उत्सुक होते. बॅ. जिना यांचा उद्देश टिळकांना शिक्षा न होणे किंवा कमी होणे हा होता. परंतु लोकमान्यांचा उद्देश काही वेगळाच होता. या खटल्यात टिळकांनी स्वत:ची बाजू स्वत: मांडली. आणि स्वत:ची बाजू मांडण्याच्या भाषणाचा रोख ज्युरीसाठी न ठेवता भारतीयांच्या प्रबोधनासाठी होता आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते तुरुंगवासात हसत जायला तयार होते. मोठी उद्दिष्टे साध्य करताना छोटय़ा लढाया हरायला ते तयार होते. एका उद्योजकांसाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे. किंबहुना जे उद्योजक आपल्या उदिष्टांबाबत स्पष्ट असतात आणि त्यांची उद्दिष्टे उच्च दर्जाची असतात त्यांच्याकडून आयुष्यात मोठी कार्ये घडतात. हेन्री फोर्ड, एलन मस्क, जमशेदजी टाटा हे नक्कीच अशा प्रकारचे उद्योजक दिसतात. आपल्या उद्योगाचा उद्देश वैयक्तिक आर्थिक सुखाच्या पलीकडे गेल्याशिवाय उद्योजकाच्या विचारकक्षा रुंदावू शकत नाहीत. आणि या कक्षा जितक्या रुंद तितकी त्याची उद्योगाची व्याप्ती आणि परिणामकारकता प्रभावी. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मोजावी लागणारी किंमत देण्याची तयारी म्हणजे उद्दिष्टांबद्दलची कटिबद्धता.

३) संकटांचा सामना : लोकमान्यांच्या आयुष्यात अनेक संकटं आली आणि त्या प्रत्येक संकटानंतर त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा प्रभाव द्विगुणित झालेला दिसतो. ज्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली त्या सोसायटीतून त्यांना मतभेदांमुळे बाहेर पडावे लागले. पण त्यामुळेच त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय राहता आले. १९०८ साली जेव्हा त्यांना मंडालेच्या तुरुंगात धाडण्यात आले त्याच्या एक वर्ष आधी त्यांना काँग्रेसमधून जवळजवळ बाजूला करण्यात आले होते. परंतु १९१४ साली जेव्हा ते ६ वर्षांचा कारावास सोसून बाहेर आले त्यानंतर ते निर्विवादपणे संपूर्ण भारताचे राजकीय नेतृत्व करण्यामध्ये अग्रेसर होते. आलेल्या प्रत्येक संकटाचा त्यांनी आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी — भारताच्या स्वराज्यासाठी वापर केला. आपणही संकटांचा उपयोग व्यक्तिमत्त्व आणि कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी करू शकतो.

अशा प्रेरणादायी लोकमान्यांकडून शिकून, कणखर राहून उच्च उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यमग्न राहण्यासाठी सर्व उद्योजकांना शुभेच्छा!

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

makarandjoshi@mmjc.in