एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफच्या माध्यमातून भांडवली बाजारातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील अर्थात ‘पीएफ’मधून गुंतवणूक कमी करणे अथवा वाढविण्याबाबतचा निर्णय आता व्यक्तिगत खातेदाराला लवकरच घेऊ शकतील.

निवृत्ती निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)मार्फत ‘ईटीएफ’च्या माध्यमातून भांडवली बाजारात ऑगस्ट २०१५ पासून गुंतवणूक केली जात आहे. सुरुवातीला ५ टक्के असलेले हे प्रमाण २०१७-१८ करिता १५ टक्के निश्चित  केले गेले आहे. मात्र चालू आर्थिक वर्षांकरिता ईटीएफ गुंतवणुकीतून होणारा लाभ हा ईपीएफओच्या पाच कोटीच्या घरात असलेल्या कर्मचारी सदस्यांच्या खात्यात दर तिमाहीला जमा केला जाईल. त्यावरून ही गुंतवणूक सुरू ठेवायची, वाढवायची की कमी करावी, असा निर्णय घेण्याची मुभा बहाल केली जाणार आहे.

ईटीएफ गुंतवणुकीचा परतावा पीएफ खात्यात जमा करणारी सॉफ्टवेअर प्रणाली येत्या दोन ते तीन महिन्यांत कार्यान्वित होईल, असे ईपीएफओचे केंद्रीय आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी सांगितले. पीएफमधील ४१,९६७.५१ कोटी रुपये हे ईटीएफमध्ये गुंतविण्यात आले असून त्यावरील परतावा २८ फेब्रुवारी २०१८ रोजी, १७.२३ टक्के आहे. मार्चमध्ये २,५०० कोटी रुपयांचे ईटीएफ युनिट्स संघटनेने विकले आहेत.