देशाच्या आर्थिक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील सांगाती असणाऱ्या भारतीय आयात-निर्यात बँकेने (एक्झिम बँक) गत तीन दशकांपासून मृतावस्थेत असलेल्या ‘निर्यात विकास निधी’ला पुनरुज्जीवित करीत, इराणमधील ३,००० कोटी रुपयांच्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पातून त्याला वाट मोकळी करून देण्याचे नियोजन आखले आहे. अलीकडेच जागतिक आर्थिक र्निबध सैल झालेल्या इराणला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी आठवडय़ातील भेटीत या प्रकल्पांसाठी पतपुरवठय़ाच्या करारावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणार आहे.
इराणसह, अफगाणिस्तानबरोबर द्विपक्षीय व्यापाराला गती देणाऱ्या पायाभूत रचना आणि कनेक्टिव्हिटीसाठी तेथील छाबाहार बंदराचा विकास भारताच्या सहकार्याने केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी कायद्याने स्थापित ‘निर्यात विकास निधी’तून अर्थसाहाय्य प्रदान केले जाणार असून, त्याचे व्यवस्थापन व देखरेखीची जबाबदारी ही एक्झिम बँकेवर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यदुवेंद्र माथूर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. येत्या २३-२४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणच्या दौऱ्यावर असतील, तेव्हा या करारावर स्वाक्षऱ्या होतील.
आग्नेय इराणच्या पाकिस्तानला भिडणाऱ्या सीमेवरील प्रस्तावित छाबाहार बंदरामुळे अफगाणिस्तानशी व्यापारातही सुलभता येईल. तेथून अफगाणिस्तानपर्यंत रस्ते आणि रेल्वेद्वारे जोडणीचे काम या आधी भारताद्वारेच पूर्ण करण्यात आले आहे, तर छाबाहारमध्ये पहिल्या टप्प्यात प्रस्तावित दोन जेट्टींचा विकास व संचालन भारतीय कंपनीद्वारेच पहिल्या १० वर्षांसाठी केले जाणार आहे, असे यदुवेंद्र माथूर यांनी स्पष्ट केले.
एक्झिम बँकेच्या आर्थिक कामगिरीची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत, २०१५-१६ सालात बँकेने विविध ५० निर्यातदारांच्या ३९ देशांतील २२,५५१ कोटी रुपये मूल्याच्या ९५ निर्यात करारांना अर्थसाहाय्य पुरविले असल्याचे माथूर यांनी सांगितले. कर्ज व्यवहारात १८ टक्क्यांची वाढ झाली आणि तरीही नक्त अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीए) प्रमाण ०.८६ टक्के अशा समाधानकारक पातळीवर बँकेला राखता आले आहे. बँकेचा वार्षिक नक्त नफा मात्र यंदा किंचित घसरून ३१६ कोटी रुपयांवर आला असल्याचे त्यांनी सांगितले.

बांगलादेशात ‘वीज मैत्री’ प्रकल्प
शेजारच्या देशांसह धोरणात्मकदृष्टय़ा मैत्रीचे संबंध आणि आर्थिक सौहार्द वाढविण्याच्या विद्यमान सरकारच्या परराष्ट्र धोरणांत योगदान म्हणून एक्झिम बँकेने आजवरच्या तिच्याकडून अर्थपुरवठा होत असलेल्या सर्वात मोठय़ा म्हणजे १.८ अब्ज अमेरिकी डॉलरच्या ‘बांगलादेश भारत वीज मैत्री’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. एनटीपीसी आणि बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या समान भागीदारीतून हा ऊर्जा प्रकल्प बांगलादेशच्या सीमेवर विकसित होत आहे. एनटीपीसीचाही हा विदेशातील पहिलाचा ऊर्जा प्रकल्प आहे. याच धर्तीवर एक्झिम बँकेने आबू धाबी येथे १०,००० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विकासात सहभाग नोंदविला आहे. नुकत्याच पॅरिसमध्ये झालेल्या हवामान परिषदेच्या ठरावानुसार ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’कडून हा प्रकल्प विकसित होत आहे.