नामांकित पंचतारांकित रुग्णालयापेक्षा सरस सोयीसुविधा, परंतु सेवेचे स्वरूप मात्र धर्मादायी अशी अपवादानेच आढळणारी संगती चेंबूरच्या सुश्रूत रुग्णालयाने साधली आहे. चेंबूर-माहुलच्या औद्योगिक पट्टय़ातील एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, टाटा पॉवर आणि इंडियन ऑइल या कंपन्यांनी आर्थिक योगदान देऊन सुश्रूतची पायाभरणी अपघातात कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी केली, परंतु उत्तरोत्तर नवीन सोयीसुविधांची भर पडून आज माटुंगा ते विक्रोळीपर्यंतच्या परिसरातील सुश्रूत हे एकमेव ‘एनएबीएच’ मान्यता असलेले सवरेपचार (मल्टिस्पेशालिटी) रुग्णालय बनले आहे.

तीन सरकारी तेल कंपन्यांसह, आरसीएफ आणि टाटा पॉवर यांनी संयुक्तपणे स्थापित केलेल्या चेंबूर हॉस्पिटल प्रोजेक्ट ट्रस्ट ही विश्वस्त संस्था सुश्रूत रुग्णालय आणि संशोधन केंद्राची प्रवर्तक आहे. कंपन्यांच्या येथील प्रकल्पात मुख्यत: भाजण्याच्या जखमांवर उपचारासाठी सोय असावी असा यामागे उद्देश होता. यातून २००० साली तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी ७७ खाटांच्या सुश्रूतचे भूमिपूजन केले. आज या कंपन्यांकडून सामाजिक दायित्वाचा निधी रुग्णालयाला मिळतोच, तर रुग्णालयानेही आता पुरेसे आर्थिक स्वावलंबन मिळविले आहे. रुग्णालयाला दरसाल होणाऱ्या नफ्यातील दोन ते पाच टक्के हिस्सा रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरीब आणि गरजूंवर मोफत उपचारासाठी खर्च केला जातो. सरलेल्या वर्षांत अशा एकूण ८८ रुग्णांना मोफत उपचाराचा, तर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत १०२ रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती सुश्रूतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. (मेजर) संजीव कुमार गोस्वामी यांनी दिली. सुश्रूतमध्ये २० खाटांचे सर्व अद्ययावत तंत्र-उपकरणांसह अतिदक्षता विभाग, २३ खाटांचे डायलिसिससह किडनी निगा विभाग, प्रख्यात डॉ. सुरेश आडवानी यांच्या देखरेखीखालील ११ खाटांचे केमोथेरपी डे-केअर विभाग, डॉ. अनिल पोतदार यांच्या नेतृत्वात आणि पारिसोहा फाऊंडेशनच्या मदतीने हृद्रोगासाठी अद्ययावत कॅथलॅब, सीटी स्कॅन, पेट-सीटी, २डी एको वगैरे अत्याधुनिक सुविधा असलेले निदान केंद्र, चार सुसज्ज ऑपरेशन थिएटर अशा समग्र वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेच्या सुविधा तुलनेने अत्यंत वाजवी दरात येथे उपलब्ध आहेत. अगदी गुडघे प्रत्यारोपण, अँजियोप्लास्टी हे उपचार रुग्णांना मुंबईतील अन्य रुग्णालयांच्या तुलनेत २५ ते ३५ टक्के कमी खर्चात येथे उपलब्ध आहेत, असे मेजर गोस्वामी यांनी सांगितले. अनेक आजारांत उपचाराचा खर्च हा आज मोठा घटक बनला आहे. मात्र सुश्रूतमध्ये केवळ वाजवी किमतीतच नव्हे, तर उच्च गुणवत्तेची सेवाही मिळते, हा विश्वास रुग्णांसाठी मोठा दिलासादायी ठरतो, असे विख्यात ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुरेश आडवानी यांनी सांगितले. रुग्णालयाच्या दैनंदिन परिचालनात सुश्रूतने आर्थिक स्वयंपूर्णता मिळविली असली, तरी नव्या सुविधा आणि पायाभूत विस्तारासाठी एचपीसीएल आणि अन्य कंपन्यांचे निरंतर योगदान येतच असते. आगामी तीन वर्षांसाठी अशा विस्तारावर १२ कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन असल्याचे रुग्णालयाच्या विश्वस्त सोनल देसाई यांनी सांगितले.

टाटा रुग्णालयावरील भार हलका

तीन नामांकित कन्सल्टंट्स, पाच निवासी डॉक्टर, निष्णात सर्जनांचा संघ यातून सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियेचे सुश्रूत हे महत्त्वाचे केंद्र बनले असल्याचा डॉ. सुरेश आडवानी यांनी दावा केला. किंबहुना टाटा कर्करोग रुग्णालयानंतर त्यासारख्या अतिविशेष चिकित्सा सुविधा केवळ सुश्रूतमध्येच असल्यामुळे टाटा रुग्णालयावरील भारही बराच हलका होऊ शकला आहे, असे ते म्हणाले.