करोना कहराच्या प्रादुर्भावाआधीच ढासळलेल्या देशाच्या निर्यातीत सरलेल्या ऑगस्टमध्ये सलग सहाव्या महिन्यांत घसरणीचा क्रम सुरूच असल्याचे मंगळवारी केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. ऑगस्ट २०२० मधील २२.७ अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात ही गत वर्षी याच महिन्यात झालेल्या २५.९ अब्ज डॉलरच्या निर्यातीच्या तुलनेत १२.९९ टक्के गडगडली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातून होणारी आयातही ऑगस्टमध्ये २६ टक्क्यांनी  गडगडून २९.४७ डॉलर नोंदली गेली आहे. परिणामी आयात-निर्यातीत तफावत असलेली व्यापार तूट ही ६.७७ अब्ज डॉलर इतकी खालावली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतील हीच एक दिलासाजनक बाब आहे. गतवर्षी म्हणजे ऑगस्ट २०१९ मध्ये व्यापार तुटीचे प्रमाण सध्याच्या तुलनेत दुप्पट म्हणजे १३.८६ अब्ज इतके होते.

आयातीतील घट मुख्यत्वे तेलाच्या आयात खर्चात कपातीमुळे आहे. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने, तेल आयात खर्च हा मागील वर्षांच्या तुलनेत ४१.६२ टक्के घसरून ६.४२ अब्ज डॉलर इतका ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आला.

सोने आयात खर्च मात्र सुवर्ण धातूच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील तीव्र स्वरूपाच्या तेजीमुळे मागील तुलनेत दुपटीहून अधिक वाढला आहे. ऑगस्ट २०१९ मधील सोने आयात १.३६ अब्ज डॉलरची होती, ती यंदा ३.७ अब्ज डॉलरवर गेली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात निर्यात २६.६५ टक्के गडगडून ९७.६६ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली आहे, त्या उलट निर्यात ४३.३६ टक्के घरंगळून ११८.३८ अब्ज डॉलर इतकी नोंदली गेली आहे. दोहोंतील तफावत म्हणजे व्यापार तूट या पाच महिन्यांत २०.७२ अब्ज डॉलर इतकी आहे.