फ्रान्सची प्युजो व इटलीच्या फियाटच्या एकत्रीकरणाला उभय कंपन्यांच्या भागधारकांनी सोमवारी मंजुरी दिली. वर्षांला ८७ लाख वाहननिर्मिती व ५ अब्ज युरोचा समूह याद्वारे आकारास आला असून जगातील चौथी मोठी वाहननिर्मिती कंपनी अस्तित्वात आली आहे.

जगातील आघाडीच्या फोक्सव्ॉगन, टोयोटा व रेनो-निस्साननंतर आता फियाट व प्युजो कंपन्यांचे स्थान असेल. प्युजो आता फियाटच्या अखत्यारित असेल. फ्रेंच फियाटच्या अखत्यारित सध्या सिट्रॉनही आहे. तिची एसयूव्ही गटातील नवी कार भारतात चालू वर्षांत दाखल होण्याची शक्यता आहे.

नव्या विलीनीकरणामुळे युरोपाबरोबरच अमेरिकेतील वाहन बाजारपेठेवर नियंत्रण मिळण्यास उभय कंपन्यांना संधी उपलब्ध होणार आहे.

उभय कंपन्यांचे आता ११ सदस्यीय संचालक मंडळ असेल. कंपनीवर पीएसएचे (फियाट) मुख्याधिकारी कालरेस टॅवेर्स यांचे वर्चस्व असेल. फियाटचे विद्यमान वरिष्ठ अधिकाऱ्यांना समूहात इतर विभाग, क्षेत्रांची जबाबदारी देण्यात आली आहे.

निस्सान १,५०० कर्मचारी भरती करणार

कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यांच्या सहकार्याने जपानी मोटारनिर्मिती कंपनी निस्सान भारतात १,५०० कर्मचारी भरती करणार आहे. वाहननिर्मितीबरोबरच वाहन विक्रीसाठी हे मनुष्यबळ कार्यरत असेल, असे स्पष्ट करण्यात आले. पैकी १,००० कर्मचारी निर्मिती प्रकल्पासाठी, तर ५०० कर्मचारी विक्री विभाग, दालनांसाठी असतील, असे नमूद करण्यात आले आहे.
कंपनीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाईटला पदार्पणातच मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर निस्साने वाहननिर्मितीही वाढविण्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या चेन्नई येथील प्रकल्पातून मासिक २,५०० ऐवजी ३,५०० ते ४ हजार मॅग्नाईट कार तयार केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीच्या नव्या वाहनासाठी महिन्याभरात ३२,८०० मागणी नोंदविली गेली आहे.