नोव्हेंबरमधील औद्योगिक उत्पादनाची उणे ३.२ टक्के घसरण

भाज्यांमुळे डिसेंबरच्या महागाई दरात ५.६१ टक्क्यांपर्यंत वाढ

२०१५च्या अखेरिसच्या वाहन विक्रीवाढीच्या आकडेवारीवरून हर्षोल्लित वातावरणावर मंगळवारी पाणी फेरले गेले. अर्थप्रगतीतील आणखी एक घटक मानला जाणारा देशाचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक उणे स्थितीत कायम राहिला आहे. नोव्हेंबरमधील हा निर्देशांक (उणे) ३.२ टक्क्यांवर नोंदला गेला आहे. तर डिसेंबरमध्ये ५.६१ टक्के दर राखताना किरकोळ किंमत निर्देशाकातील महागाई दर सलग पाचव्या महिन्यात वाढता राहिला आहे.

निर्मिती क्षेत्रातील सुमार कामगिरीमुळे नोव्हेंबरमधील औद्योगिक उत्पादनाचा स्तर कमालीचा घसरला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील निर्मिती क्षेत्राची गती (उणे) ४.४ टक्के राहिली आहे. ऊर्जा उत्पादन अवघ्या ०.७ तर खनिकर्म २.३ टक्क्यांनी वाढले आहे. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या आठ महिन्यांतील औद्योगिक उत्पादन वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ४.८ टक्क्यांवरून यंदा ३.९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

नोव्हेंबरमधील औद्योगिक उत्पादन हे गेल्या चार वर्षांतील किमान स्तरावर नोंदले गेले आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०११ मध्ये ते ४.७ टक्के अशा किमान स्तरावर होते. तर वर्षभरापूर्वी, नोव्हेंबर २०१४ मध्ये ते ५.२ टक्के होते. यंदा भांडवली वस्तू क्षेत्रानेही (उणे) २४.४ टक्के अशी नकारात्मक कामगिरी बजाविली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७५ टक्क्यांपर्यंत हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची कामगिरी यंदा खूपच खराब राहिली आहे. या निर्देशांकातील २२ उद्योगांपैकी १७ उद्योग नोव्हेंबर २०१५ मध्ये नकारात्मक यादीत राहिले आहेत.

किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित गेल्या महिन्यातील महागाईचा दर भाज्या तसेच अन्य खाद्यपदार्थाच्या किमती वाढल्याने नोव्हेंबरच्या ५.४१ टक्क्यांच्या तुलनेत वाढला आहे. तर वर्षभरापूर्वीच्या, डिसेंबर २०१४ मधील ४.२८ टक्क्यांपेक्षाही तो किती तरी अधिक आहे. डिसेंबर २०१५ मध्ये अन्नधान्याचा महागाई दरदेखील वाढून ६.४० टक्क्यांवर गेला आहे. डिसेंबरमध्ये मटण, मासे यांच्या किमती ५.३४ टक्क्यांवरून ६.५७ टक्क्यांवर गेल्या आहेत. तर अंडीही ०.५० टक्क्यांवरून ०.९७ टक्क्यांपर्यंत महाग झाली आहेत. डाळींच्या किमतीतील वाढही ४५.९२ टक्क्यांपर्यंत गेली आहे. तेलआदी वस्तूंच्या किमतीही ७.०६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पतधोरणासाठी महत्त्वाचा ठरणारा किरकोळ महागाई दर वाढल्याने येत्या महिन्यात होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर निश्चिततेबाबत पुन्हा शंकास्थिती निर्माण झाली आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण २ फेब्रुवारी रोजी आहे. बँकेने यापूर्वीच्या ताज्या पतधोरणात स्थिर व्याजदर ठेवले होते. मात्र आता महागाई दर वाढल्याने यंदा व्याजदर कपातीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. जानेवारी २०१६ पर्यंत महागाई दराचा ६ टक्क्यांचा अंदाज  रिझव्‍‌र्ह बँकेने बांधला आहे.

सलग १४ व्या महिन्यात विक्री वाढ नोंदविणाऱ्या भारतीय वाहन उद्योगाबाबतचे सकारात्मक वृत्त सोमवारीच धडकले होते. डिसेंबरमध्ये १३ टक्क्यांची वाढ नोंदविणाऱ्या या उद्योगाबाबत अर्थव्यवस्था सावरल्याचे परिमाण मानले जात असतानाच मंगळवारच्या औद्योगिक उत्पादन व महागाई दराने अर्थव्यवस्थेवरील चिंता कायम ठेवली आहे.