पुढील वर्षांच्या उद्दिष्टाबाबत मात्र निग्रह

आर्थिक पाहणी अहवाल २०१८-१९ मध्ये विकास दराचा अंदाज उंचावण्याबरोबरच वित्तीय तुटीचे लक्ष्य कायम राखले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी निती आयोगाने मात्र चालू वित्त वर्षांत वित्तीय तूट आधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा अधिक राहण्याची भीती व्यक्त केली आहे.

निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सोमवारी येथे सांगितले की, यंदा वित्तीय तुटीबाबत सरकारकडून आजवर पाळली गेलेली शिस्त काहीशी बिघडण्याची चिन्हे आहेत. सरकारचे निर्गुतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे तसेच बिगर कर महसुली संकलन वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यंदा राखलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी आहेत.

२०१७-१८ करिता वित्तीय तुटीचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ३.२ टक्के, तर २०१८-१९ करिता ते ३ टक्के निश्चित करण्यात आले आहे. सरकार कर संकलन वाढविण्यावर भर देत असून येत्या कालावधीत त्याचा योग्य तो परिणाम दिसून येईल, असे कुमार यांनी एका इंग्रजी वित्त वृत्त वाहिनीला सांगितले.

सध्या वाढणाऱ्या खनिज तेलाचे दर हे वित्तीय तुटीचे गणित बिघडविणारे ठरेल. तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलांच्या दरांचा आगामी प्रवास हा अनिश्चित असून, तो सध्या तरी हेरण्यासारखा नाही, असेही ते म्हणाले.