संतोष सावंत

एकामागून एक आलेल्या चक्रीवादळांमुळे एकीकडे मासेमारी उद्योग हेलकावे खात असताना, त्यावर अवलंबून असलेला मत्स्यनिर्यात उद्योगही संकटात सापडला आहे. यंदा पुरेशी मासळी उपलब्ध नसल्याने देशातील ४५०हून अधिक शीतगृहांना चढय़ा दराने मासळी खरेदी करून त्याची निर्यात करावी लागत आहे. मासळी नसल्यामुळे गेल्या वर्षभरात या व्यवसायातून होणारी मत्स्यनिर्यात  ७० टक्क्यांनी कमी झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

किनारपट्टीवर उपलब्ध होणारी मासळी खरेदी करून ती युरोप, चीन यांसारख्या देशांना पुरवणाऱ्या शीतगृहांची देशातील एकूण संख्या ४५० इतकी आहे. यापैकी महाराष्ट्रात ३० शीतगृहे असून त्यातील जवळपास १८ शीतगृहे नवी मुंबईतील तळोजा परिसरात आहेत. ही शीतगृहे स्थानिक मच्छीमार संस्थांकडून, व्यावसायिकांकडून घाऊक मासे खरेदी करून निर्यातदार कंपन्यांना पुरवतात. त्यासाठी त्यांचे निर्यातदार कंपन्यांशी दरकरारही झालेले असतात. दरवर्षी ३० हजार मेट्रिक टन माशांची खरेदीविक्री या शीतगृहांमार्फत होते. वर्षांला चार हजार कोटींची होणारी उलाढाल सध्याच्या मत्स्यटंचाईमुळे एक हजार कोटींवर आली आहे.

नारळीपौर्णिमा झाली की, मच्छिमार बोटी खोल समुद्रात मासेमारीला जातात. मात्र, यंदा आधी उशिरा आलेल्या पावसामुळे बदललेले हवामान आणि त्यानंतर एकापाठोपाठ आलेली चक्रीवादळे यांमुळे ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने मासेमारी बंद ठेवावी लागली आहे. परिणामी मासळीची आवक घटली असून निर्यातदारांनी केलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे अशक्य झाल्याचे शीतगृह चालकांचे म्हणणे आहे.

या शीतगृहांना महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात किनारपट्टीवरील मच्छीमारांकडून मत्स्यपुरवठा होतो. यापैकी कोळंबी, माकूळ या माशांची निर्यात युरोप, जपानला केली जाते. तर, घोळ आणि वाकटी या माशांना चीनमधून मागणी असते. यंदा ही मासळीच उपलब्ध होत नाही. कंपन्यांशी करार केल्यामुळे त्यांना कबूल केलेला मत्स्यपुरवठा करावाच लागतो. शिवाय त्याचे दरही आधीच ठरलेले असतात. त्यामुळे जादा दराने मासळी खरेदी करून पूर्वनिश्चित दरांतच त्यांची विक्री करावी लागत आहे. यामुळे उद्योजकांचे नुकसान होत आहे, अशी माहिती संचिता मरिन या शीतगृहाचे संचालक संदीप डोंगरे यांनी दिली.

कामगारांना बसून पगार

या शीतगृहांमध्ये येणाऱ्या मासळीचे वर्गीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ लागते. त्यासाठी शीतगृह चालक महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ अशा राज्यांतील कामगारांची मे महिन्यातच भरती करतात. जून आणि जुलै दोन महिने पावसामुळे मासेमारी बंद असल्याने या काळात त्या कामगारांना बसून पगार दिला जातो. मात्र, यंदा ऑगस्ट ते नोव्हेंबपर्यंत बहुतांश कालावधीत मासेमारी बंद असल्याने या कामगारांना सहा महिने बसून पगार देण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.

मासळीला जादा भाव

मे महिन्यात कोळंबीचा दर तीनशे किलो होता आता देशाअंतर्गत बाजारपेठेत पाचशे रुपयांनी कोळंबी विक्री होत असल्याने याच दराने शीतगृहमालकाला खरेदी करावे लागते. अशीच अवस्था माकूळ जातीच्या माशांची आहे. पूर्वी १५० रुपये किलोग्रॅमने मिळणारे माकूळ आता अडीचशे रुपये किलोग्रॅमनीही मिळत नाही. घोळ आठशे रुपये किलोने ऐरवी खरेदी केला जातो मात्र सध्या याची किंमत दोन हजार रुपये प्रती किलोने केली जात आहे. बांगडा मासा पहिले शंभर रुपयांनी मिळत होता सध्या त्याची किंमत अडीचशे रुपयांवर पोहचली आहे. सूरमई माशाला परदेशापेक्षा अधिक दर देशाअंतर्गत बाजारपेठेत मिळत असल्याने देशातील बाजारपेठ परदेशापेक्षा मोठी ठरत आहे.