फ्लिपकार्टचा वॉलमार्ट इंडियावर ताबा

अ‍ॅमेझॉनला रिलायन्स रिटेलमध्ये रस

फ्लिपकार्ट या भारतात विकसित ई-कॉमर्स क्षेत्रातील समूहाने गुरुवारी वॉलमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा संपादित करून ‘फ्लिपकार्ट होलसेल’ या नव्या डिजिटल बाजारमंचाच्या अनावरणाची घोषणा केली. भारतातील किराणा आणि वाणसामानाच्या क्षेत्रातील उज्ज्वल संधी लक्षात घेत, अमेरिकेची महाकाय ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे रिलायन्स रिटेलमध्ये स्वारस्य दिसून येत आहे.

किराणा क्षेत्रातील जागतिक कंपनी वॉलमार्टने २०१८ सालीच १६ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबादल्यात फ्लिपकार्टचे बहुतांश भागभांडवल ताब्यात घेतले आहे. भारतातील तिची उपकंपनी वॉलमार्ट इंडियाकडून ‘बेस्ट प्राइस’ नावाने २८ घाऊक विक्री  दालने चालविली जातात. गुरुवारी झालेल्या सौद्यात ही  दालने वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकली असून, त्यांचे ‘फ्लिपकार्ट होलसेल’ असे नामकरण केले आहे. बेस्ट प्राइसने १२ वर्षांच्या कार्यकाळात १५ लाखांहून अधिक विक्रेत्यांशी संधान जुळविले आहे.

दुसरीकडे २००६ सालातील स्थापनेपासून देशभरात ६,५०० ठिकाणी जवळपास १०,००० विक्री केंद्रांचे जाळे विणलेल्या रिलायन्स रिटेलमधील ९.९ टक्के भागभांडवली हिस्सा मिळविण्यासाठी अ‍ॅमेझॉन उत्सुक असल्याचे दिसून येते. अ‍ॅमेझॉन इंडियामार्फत ई-कॉमर्स क्षेत्रात भारतात मजबूत पाय रोवलेल्या या कंपनीने आता थेट ग्राहक संपर्काची आस ठेवून प्रत्यक्ष दालनांद्वारे अस्तित्व निर्माण करावयाचे नियोजन यामागे दिसून येते.