समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात चार वर्षांत पहिल्यांदाच आवक घटली. करोना आणि टाळेबंदीच्या कालावधीत म्युच्युअल फं डसारख्या पर्यायातून गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अ‍ॅम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात निव्वळ ३,८४५ कोटींची गुंतवणूक झाली. जून महिन्यातील २२५ कोटी गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक सकारात्मक असली तरी मार्च २०१६ नंतर प्रथमच नफावसुलीमुळे फोकस आणि करबचतीसाठी केल्या जाणाऱ्या ईएलएसएस फंड वगळता अन्य फंड गटांत गुंतवणूकदारांनी रक्कम काढून घेतली असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. गुंतवणूक काढून घेण्याचा सर्वाधिक फटका मल्टी कॅप आणि मिड कॅप फंड गटाला बसला आहे. जुलै महिन्यात हायब्रीड फंडांतून ७,३०२ कोटींची निर्गुतवणूक झाली तर ३५५.८ कोटींची आवक झाली.

सॅमको रॅन्क म्युच्युअल फंडाचे प्रमुख ओंकेशावर सिंग यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, मागील तीन वर्षांपासून एसआयपी करत असलेल्या नवगुंतवणूकदारांना अपेक्षेइतका परतावा मिळाला नाही. मार्च महिन्यात भांडवली बाजार गडगडल्यामुळे २०-२५ टक्के तोटा दिसत होता. आता बाजार सावरल्यामुळे तोटय़ातून नफ्यात आलेली गुंतवणूक पाहून अनेकांनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून काढता पाय घेतल्याचे दिसत आहे.

समभाग गुंतवणुकीच्या तुलनेत रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांत जुलै महिन्यात चांगली आवक झाली. या गुंतवणुकीचे लिक्विड फंड सर्वाधिक लाभार्थी ठरले.

जुलै महिन्यात लिक्विड फंडात १४,०५५ कोटी गुंतविण्यात आले. त्याखालोखाल ‘बाँड ईटीएफ लाभार्थी ठरले. भारत बाँड ईटीएफच्या निमित्ताने १३,१२५ कोटी बाँड ईटीएफमध्ये गुंतविण्यात आले. कॉर्पोरेट बाँड फंडात ११,९१० कोटींची गुंतवणूक झाली, तर क्रेडिट रिस्क फंडातून पैसे काढून घेण्याचा मागील सहा महिन्यांपासूनचा कल जुलै महिन्यात सुरूच राहिला.

जुलै महिन्यात क्रेडिट रिस्क फंडांतून ६६९ कोटी काढून घेण्यात आले. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मागील महिन्यातील २५.५ लाख कोटींच्या तुलनेत जुलै महिनाअखेर २७.१ लाख कोटींवर पोहोचली आहे.

मार्चपासून बाजार निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदार नफावसुली करीत असावेत. आमच्या मंचावर गुंतवणूकदार एसआयपी वाढवत असल्याचा कल दिसला; सध्या जीवनावश्यक गोष्टींव्यतिरिक्त प्रवास व अन्य चैनीच्या गोष्टींवर पैसे खर्च होत नसल्याने गुंतवणूकदार एसआयपी वाढविण्याचा निर्णय घेत असल्याची शक्यता असू शकेल, असे प्रतिपादन ग्रो अ‍ॅपचे सहसंस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी हर्ष जैन यांनी केले.

बीएसई स्टार एमएफवर कंपन्यांनाही पर्याय

मुंबई शेअर बाजाराच्या ‘बीएसई स्टार एमएफ’ या म्युच्युअल फंड मंचावर कंपन्यांसाठी मध्यस्थांना वगळून म्युच्युअल फंडांचे थेट पर्याय उपलब्ध झाल्याची माहिती मुंबई शेअर बाजाराच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. ‘स्टार एमएफ कॉर्प डायरेक्ट’ हा मंच मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या (म्युच्युअल फंड ), फंड वितरक, गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड उद्योगातील इतर सहभागींना फंड व्यवहारांची मूल्यवर्धित सेवा प्रदान करेल, असे या निवेदनात म्हटले आहे. सध्या हा मंच केवळ कंपन्यांसाठी उपलब्ध असून लवकरच हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था, अन्य बिगर व्यक्तिगत गुंतवणूकदरांसाठी उपलब्ध असेल. मुंबई शेअर बाजाराच्या म्युच्युअल फंड व्यवसायाचे प्रमुख गणेश राम यांनी सांगितले की, या वर्षांच्या सुरुवातीला बाजार नियामक सेबीने भांडवली बाजारांना मध्यस्थ वगळून गुंतवणूक सेवा देणारा मंच उपलब्ध करून देण्याची निर्देश दिले होते. या निर्देशाची पूर्तता आशिया खंडातील सर्वात जुन्या भांडवली बाजाराने स्टार एमएफ कॉर्पोरेशन डायरेक्टच्या रूपाने केली आहे.