केंद्र सरकारने सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) व अशाप्रकारच्या अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कर्मचाऱ्यांना जीपीएफवर ८ टक्क्याने व्याज मिळणार आहे. केंद्रीय वित्त विभागाने याबाबतचं परिपत्रक काढून माहिती दिली. यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीपीएफवरील हा व्याजदर ७.६ टक्के होता. यात आता वाढ करण्यात आल्याने जीपीएफ धारकांना दिलासा मिळाला आहे. नवे व्याजदर केंद्र सरकारी कर्मचारी, रेल्वे तसेच सुरक्षा दलांच्या भविष्य निर्वाह निधीवरही लागू असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रं, किसान विकास पत्रं, पीपीएफ आणि छोट्या बचत योजनांवरील व्याज दर ०.४ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा सरकारने गेल्या महिन्यात केली होती. त्यानुसार, १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि त्यासारख्या अन्य फंडांमधील खातेदारांना ८ टक्के व्याज मिळेल. गेल्या दोन तिमाहीत हे व्याजदर जैसे थे होते. जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड हे असं खातं आहे जे फक्त सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. सरकारी कर्मचारी या खात्यात स्वतःच्या पगारातील ठरावीक रक्कम ठेवून सदस्य बनू शकतात.