नवी दिल्ली : सहारा समूहातील स्थावर मालमत्ता तसेच शहर विकास व्यवसायात दोन आघाडीच्या विदेशी गुंतवणूकदारांनी उत्सुकता दर्शविली असून समूहाच्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम व्याजासह मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास प्रवर्तक सुब्रता रॉय यांनी व्यक्त केला आहे.

सहारा समूहासमोरील सर्व समस्या चालू, २०२० मध्ये संपुष्टात येण्याबाबतचे आश्वासक उद्गारही रॉय यांनी काढले आहे. समूहाने २२,००० कोटी रुपये भांडवली बाजार नियामक सेबीकडे जमा केल्याचेही रॉय यांनी सांगितले.

सहाराच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात रॉय यांनी, देणेकऱ्यांची रक्कम वेळेत देण्याबाबतच्या परंपरेशी समूह बांधील असून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याबाबतचा कलही कायम ठेवण्यात येत आहे, असे नमूद केले आहे.

मात्र गेल्या सात वर्षांपासून काही अपरिहार्य कारणास्तव देणी देण्यात अपयश येत आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सहाराच्या गुंतवणूकदारांना देय असलेली सर्व रक्कम दिली जाईल व त्यात विलंब झाल्यास प्रत्येक दिवसामागे व्याज दिले जाईल, असेही रॉय यांनी म्हटले आहे. गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या रकमेपैकी एकही पैसा सहारा समूहाकरिता वापरण्यात आलेला नाही, असाही दावा रॉय यांनी या पत्रात केला आहे.

सहारा समूहाच्या दोन कंपन्यांनी रोखे सादर करून गुंतवणूकदारांकडून कोटय़वधीची रक्कम जमा केली आहे.

गुंतवणूकदारांची रक्कम मालमत्ता विकून सेबी-सहाराच्या संयुक्त बँक खात्यात जमा केल्याचा दावा रॉय यांनी केला आहे.

समूहाच्या निवासी मालमत्तांच्या खरेदीदारांकडून घेतलेली अग्रिम रक्कम बँक खात्यात जमा झाल्याने समूहाच्या स्थावर मालमत्ता तसेच वसाहत विकसित करण्यात अडचण येत असल्याचे नमूद करत मात्र दोन विदेशी गुंतवणूकदारांनी यासाठी सहाय्याची तयारीही दाखविल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.