फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने शुक्र्नवारी भांडवली बाजार नियामक सेबीसमोर सपशेल माफी मागितली. ऋणपत्रात गुंतवणूक करणारे सहाही फंड कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केल्याबदल फंड घराण्याने फ्रँकलिन टेम्पल्टनच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी जेनी जॉन्सन यांना उद्धृत करत नियामकांसमोर लोटांगण घातले.

फंड घराण्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात, जेनी जॉन्सन यांनी म्हटले आहे की, आमचे फंड घराणे बाजार नियामक सेबीचा कायम आदर करत आलेले असून झाल्या प्रकारामुळे संबंधितांना झालेल्या त्रासाबाबत आम्ही आम्ही खेद प्रगट करून बिनशर्थ माफी मागत आहोत. माझ्या काही वक्तव्यांचा काही माध्यमांनी संदर्भ सोडून केलेल्या अप्रचारामुळे सेबीशी संबंधितांना त्रास झाला त्या बद्दल खंत वाटते.

भारतात विशिष्ठ पतपेक्षा कमी पत धारण करण्याऱ्या ऋणपत्रांना गुंतवणूक योग्य समजण्यात येत नाही. तसेच गुंतवणूक योग्यतेपेक्षा कमी पत असलेल्या ऋणपात्रांची रोकड सुलभता भारतातील रोखे बाजार फारच संकुचित असल्याचा हा परिणाम असल्याचे उधृत केले. बंद करण्यात आलेल्या फंडाची २५ टक्के गुंतवणूक सूचिबद्ध नसलेल्या ऋणपत्रात होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांनी सूचिबद्ध नसलेल्या ऋणपत्रात गुंतवणूक करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. या सूचनांनुसार सूचिबद्ध नसलेल्या ऋणपत्रातील गुंतवणुकीची कमाल मर्यादा १० टक्क्य़ांवर आणल्याने या परिपत्रकानंतर मर्यादेपेक्षा अधिक असलेली ऋणपत्रे विकता न आल्याचा हा परिणाम असल्याचे जेनी जॉन्सन यांचे विधान भारतीय बाजारात खळबळजनक ठरले.

या विधानांवर आक्षेप घेत सेबीने पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देणारे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्याची नामुष्की फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडावर ओढवली आहे.

दरम्यान, बंद केलेल्या योजनातील रक्कम गुंतवणूकदारांना लवकरात लवकर परत करण्याच्या सूचना सेबीने या फंड घराण्याला केल्या आहेत.