मेमध्ये ४.४३ टक्के; १४ महिन्यांतील उच्चांकी दर

पेट्रोल तसेच डिझेलच्या दरभडक्याने महागाई दर गेल्या महिन्यात ४.४३ टक्क्यांवर झेपावला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित मेमधील महागाई दर आता १४ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति पिंप ८० डॉलर असे गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकांपर्यंत पोहोचले होते.

आधीच्या, एप्रिल महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक ३.१८ टक्के तर वर्षभरापूर्वी, मे २०१७ मध्ये तो २.२६ टक्के होता. मेमधील ५ टक्क्यांच्या नजीकचा किरकोळ महागाई दर नुकताच स्पष्ट झाला आहे. तो गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक होता. तर यापूर्वीचा सर्वाधिक घाऊक महागाई दर मार्च २०१७ मध्ये ५.११ टक्के नोंदला गेला होता.

गुरुवारी जाहीर झालेल्या घाऊक किंमत निर्देशांकानुसार, मेमधील इंधन आणि ऊर्जा गटातील महागाई थेट ११.२२ टक्क्यांपर्यंत झेपावली आहे. तर अन्नधान्याच्या किमती यंदाच्या मेमध्ये १.६० टक्क्यांपर्यंत विस्तारल्या आहेत.

गेल्या महिन्यात भाज्यांचे दर २.५१ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. बटाटय़ाच्या किमती विक्रमी अशा ८१.९३ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. मेमधील फळे तसेच डाळ्यांमधील वाढ ही दुहेरी अंकात पोहोचली आहे.

आणखी व्याजदर वाढ अटळ

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये महागाई वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करत रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्का रेपो दर वाढविले होते. रिझव्‍‌र्ह बँकेची ही भीती खरी ठरली आहे. तसेच भविष्यातही दरवाढ होण्याची शक्यता बँकप्रमुखांनीही व्यक्त केली आहे. उद्योग क्षेत्राने मात्र अर्थविकासाला चालना देण्यासाठी दरकपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे.