जर्मनीत मुख्यालय असलेल्या युरोपातील आघाडीच्या ऱ्हीनस समूहाने भारतात वेस्टर्न आर्या समूहाबरोबर २०१० सालापासून सुरू असलेल्या भागीदारीत आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘ऱ्हीनस लॉजिस्टिक्स इंडिया लि.’ या संयुक्त कंपनीचे रूप दिले आहे. नव्या कंपनीने ‘ऱ्हीनस’ हीच नाममुद्रा धारण केली असली तरी त्यात ऱ्हीनस समूहाचा भागभांडवली वाटा ४९ टक्के, तर वेस्टर्न आर्या समूहाकडे ५१ टक्के असा मोठा हिस्सा असेल. आर्य कुटुंबाच्या मालकीच्या वेस्टर्न आर्य आणि ऱ्हीनस प्रोलॉजिस्टिक्स इंडिया लि. या दोन्ही कंपन्या या संयुक्त कंपनीत विलीन झाल्या आहेत. या संयुक्त कंपनीच्या माध्यमातून भारतातील आपले अस्तित्व लक्षणीयरीत्या मजबूत करण्याबरोबरच, आशियाई क्षेत्रात ऱ्हीनस ब्रॅण्डसाठी बाजारपेठ विकसित करण्यासही मदत मिळेल, असा विश्वास ऱ्हीनस समूहाचे मुख्याधिकारी क्लीमेन्स रेथमान यांनी सांगितले. संयुक्त कंपनीचा प्रामुख्याने पश्चिम भारतावर भर असेल आणि देशभरात ३० कार्यालये आणि ८०० हून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ असेल. विवेक आर्य आणि परीक्षित आर्य हे या संयुक्त कंपनीचे अनुक्रमे व्यवस्थापकीय संचालक व सहव्यवस्थापकीय संचालक असतील, तर ऱ्हीनसचे प्रतिनिधित्व उवे ओइमेलन यांच्याकडून केले जाईल.