‘आयएलएफएस’कडून संस्थेच्या अधिकारी, कुटुंबीयांना भेटवस्तू दिल्याचे निष्पन्न

नवी दिल्ली : रिआल माद्रिद फुटबॉल सामन्याचे तिकीट, ऐषारामी निवासाची सुविधा, महागडे फिटबिट घडय़ाळ व शर्ट आदी अनेक नजराणे ‘आयएल अँड एफएस’च्या पूर्वाश्रमीच्या उच्चाधिकाऱ्यांकडून असंख्य प्रकरणी पतमानांकन संस्थांच्या उच्चपदस्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुक्तहस्ते देण्यात आल्याचे आणि त्याबदल्यात मनाजोगते पतमानांकन मिळविले गेल्याचे या घोटाळ्याच्या तपासातून पुढे आले आहे.

तपासाची चक्रे फिरू लागली आणि तोवर दोन बडय़ा पतमानांकन संस्थांच्या प्रमुखांना घरचा रस्ता धरावा लागला असल्याचेही समोर आले आहे. इक्रा आणि केअर रेटिंग्ज या दोन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या कंपन्यांच्या संचालक मंडळाने आठवडय़ाच्या फरकाने सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या कारवाया केल्या आहेत. सुमारे ९०,००० कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या आणि आज कर्ज परतफेडीत असक्षम ठरलेल्या ‘आयएल अँड एफएस’ने कर्जरोख्यांना उच्चतम मानांकन हे पतमानांकन संस्थांमधील उच्चपदस्थांशी संधानाशी वापरात आणलेले वेगवेगळे हातखंडे पुढे आले आहेत.

‘आयएल अँड एफएस’चे संचालक मंडळ बरखास्त करून, सरकारनियुक्त संचालकांकडून सध्याचा या समूहाचा कारभार पाहिला जात आहे. बरखास्त संचालक आणि माजी उच्चपदस्थांकडून अनेक प्रकारचे गैरव्यवहार केले गेले आणि याप्रकरणी पतमानांकन संस्थांच्या भूमिकेचीही छाननी क्रमप्राप्त ठरली आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक लेखातपासणी करण्याचे काम ‘ग्रँट थॉर्नटन’कडून सुरू आहे.

न्यायवैद्यक लेखातपासणीच्या अंतरिम अहवालात, पतमानांकन संस्थांचा ‘रेटिंग’संबंधाने कृपाशीर्वाद मिळविण्यासाठी त्या कंपन्यांच्या उच्चपदस्थांसह त्यांच्या कुटुबीयांवर भेटवस्तू व नजराण्यांची प्रकरणेही प्रकाशात आली आहेत.

‘रेटिंग’ कृपेतून काय साधले?

पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या ‘आयएल अँड एफएस’सारख्या कंपन्या त्यांना आवश्यक असलेला निधी खुल्या बाजारातून वेगवेगळ्या पत साधने व ऋणपत्रांद्वारे उभा करतात. मुद्रा बाजारातून आयएलएफएस समूहातील विविध कंपन्यांकडून केल्या गेलेल्या या निधी उभारणीसाठी अर्थातच गुंतवणूकदारांना आकर्षित करणे क्रमप्राप्त होते. या कामी पतमानांकन संस्था आणि त्यांनी दिलेले ‘रेटिंग’ अर्थातच उपयुक्त ठरते. गुंतवणूकदारांच्या लेखी कंपनीची परतफेडीची क्षमता आणि त्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची आनुषंगिक सुरक्षितता निश्चित करणारा ‘रेटिंग’ हा एक प्रमुख निकष असतो. आज हजारो गुंतवणूकदारांचे कोटय़वधीचे नुकसान करणाऱ्या आयएलएफएस समूहातील अनेक कंपन्यांच्या रोख्यांना ‘एएए’ (ट्रिपल ए) असे सर्वोच्च सुरक्षितता दर्शविणारे मानांकन मिळण्यामागील ‘गुपित’ आता पुढे येत आहे. केअर, इक्रा, इंडिया रेटिंग्ज आणि ब्रिकवर्क या प्रमुख पतमानांकन कंपन्यांनी आयएलएफएस समूहातील कंपन्यांच्या रोख्यांना ‘रेटिंग’ दिले आहे, या सर्व कंपन्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई आहे.