मागील काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातील प्रति तोळा ४० हजार रूपयांपर्यंत दर असणाऱ्या सोन्याची किंमत आज (प्रती तोळा) दोन हजार रुपयांनी कमी झाली आहे. बुधवारीही सोन्याचा दर १७३० रुपयांनी घसरला. म्हणजेच मागील दोन दिवसांमध्ये सोन्याचा दर ३ हजार ७३० रुपयांनी कमी झाला आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही चार हजारांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा दर प्रती तोळा ३७ हजार ८७७ इतका असून चांदीचा दर प्रती किलो ४७ हजार ५१८ इतका आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर ३९२७८ रूपये प्रती तोळा इतकी वधाला होता. मात्र मागील दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होताना दिसत आहे. रुपयाला मिळालेलं बळ आणि मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.

बुधवारी प्रति दहा ग्रॅमला ३८ हजार १५४ रूपये असणारा दर आज ३७ हजार ८७७ इतका आहे. चांदीच्याही दरांत मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. बुधवारी प्रतिकिलो ४७ हजार ६८६ रुपये असणारा दर आज ४७ हजार ५१८ इतका आहे. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत प्रतिकिलो ५१,४८९ रूपये होती. भारतात उत्सावाच्या काळामध्ये सोन्या चांदीची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल २४ टक्क्यांनी तर चांदीच्या दरात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमागील एक कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेलं व्यापार युद्ध असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचं सावटही एक कारण असू शकते. सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. जागतिक मंदीवर मात देण्यासाठी व उत्पादनाला तसेच आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी युरोप व अमेरिकेच्या मध्यवर्ती बँका व्याजदरांमध्ये कपात करतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जर व्याजदरांमध्ये कपात झाली तर सोन्याचे भाव चढेच राहतील कारण सुरक्षिततेसाठी गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करतील असा तज्ज्ञांचा होरा आहे. परंतु सध्यातरी सोन्याच्या भावात लक्षणीय घसरण झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढेल अशी आशा या क्षेत्रातले उद्योजक करत आहेत.