भारतीय बाजारपेठेमधील सोन्या चांदींच्या दरांमधील घसरणीचे सत्र सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा ०.२७ टक्क्यांनी गडगडले. त्यामुळे सोन्याचे दर आज प्रति तोळा ४९ हजार ७७१ रुपायांपर्यंत खाली आले. तर दुसरीकडे चांदीच्या दरांमध्येही ०.५० टक्क्यांची घसरण होऊन प्रति किलो दर ५९ हजार ३२९ रुपयांपर्यंत गडगडले. पहिल्या सरत्रामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा ०.६४ टक्क्यांनी म्हणजेच ३०० रुपये तर चांदीचे दर प्रति किलोसाठी १.८ टक्के म्हणजेच एक हजार ६० रुपयांनी वधारले होते. मात्र या संपूर्ण आठवड्यामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्या चांदींच्या दराला घरघर लागल्याचे चित्र दिसून आलं. या आठवड्यामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा दोन हजारांनी तर चांदीचे दर प्रति किलो ९ हजारांनी स्वस्त झालेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्येही सोन्याचे दर घसल्याचे दिसत आहे. सोन्याचे दर आज ०.२ टक्क्यांनी पडले आणि प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) १८६४.४७ डॉलरपर्यंत आले. आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याचे दर चार टक्क्यांनी कमी झालेत. तर चांदीचे १.१ टक्यांनी घसल्याने प्रति औंस २२.९५ डॉलरपर्यंत खाली आले. प्लॅटीनमचा दर ०.३ टक्क्यांनी घसरुन ८६४.७२ डॉलरला तर पॅलाडियमचा दर दोन हजार २२६.४४ डॉलरपर्यंत कमी झाले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या किंमतीमध्ये मागील काही दिवसांनी सातत्याने घट होताना दिसत आहे. अमेरिकन चलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिक मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी पडझड झाली आहे. या आठवड्यामध्ये डॉलर इंडेक्स १.५ टक्क्यांनी वधारला. एप्रिलनंतर डॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

नक्की पाहा >> या दहा देशांकडे आहे जगातील सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

सोन्या चांदीचे भाव घसरत आहे हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे हे निर्देश आहेत अस एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी पीटीआयशी बोलताना म्हटलं होतं. करोनाची दुसरी लाट येऊ शकते या भितीने गुंतवणुकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच अमेरिकन चलन अधिक मजबूत होताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये आणखीन घसरण होऊ शकते असंही तज्ज्ञांचं मत आहे.