धनत्रयोदशीचा खरेदीचा मुहूर्त दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना पारंपरिक संपन्नतेचे प्रतीक असलेले सोन्याचा भावही कळसाला जाताना दिसत आहे. शुक्रवारी तोळ्याला सोन्याचा भाव ३२ हजार रुपये या विक्रमी स्तराला पोहचला.
राजधानीत नवी दिल्लीत सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी २७० रुपयांनी वधारत ३२,०४० रुपयांपर्यंत गेला. पिवळ्या धातूने ही चमक २६ सप्टेंबर रोजी पाहिली होती. तर चांदीही येथे किलोमागे जवळपास हजाराने वाढून ७० हजारानजीक पोहोचली आहे.
मुंबईच्या सराफा बाजारातही सोन्याचा तोळ्यामागे भाव एकदम ४२० रुपयांनी वाढून ३१,७५५ पर्यंत गेला. स्टॅण्डर्ड आणि शुद्ध अशा दोन्ही धातू प्रकारात समान वाढ होती. यामुळे मुंबईत सोने दीड महिन्यानंतर ३१,६०० च्या पुढे गेले आहे. दरम्यान, चांदीच्या दरातही येथे किलोमागे ९५० रुपयांची वाढ होऊन ते ६१,२४० रुपये झाले आहे.    

धनत्रयोदशीला २० टक्के वाढीचा अंदाज
सोने दरातील ताजी वेगवान वाढ पाहता येत्या रविवारी सोन्याचा १० ग्रॅमचा दर ३२,५०० रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आघाडीच्या सराफांनी व्यक्त केला आहे. सोने तोळ्यासाठी ३२ हजाराचा भाव गाठलाच असून, धनत्रयोदशीचा खरेदीचा मुहूर्त २० टक्क्यांनी फलदायी ठरेल असा कयास केला जात आहे. वजनाच्या बाबतही सोन्याची उलाढाल ३० टक्कयांनी वाढेल, असे सराफा वर्तुळात सांगितले जात आहे. अर्थात ही तुलना गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीशी तुलनेत ही वाढ अपेक्षित आहे. तर एकूण विक्रीच्या बाबत यंदा रविवार असल्याने, मुहूर्ताच्या दिवशी १० टक्केच वाढ होईल, असाही त्यांचा होरा आहे.

दिल्लीत सोने आज तोळ्यामागे २७० रुपयांनी वाढले. १० ग्रॅमसाठी त्याचा भाव ३२,४०० रुपये होता. उद्याही अशीच २०० ते ३०० रुपयांपर्यंतची वाढ झाल्यास सोने ३२,५०० ला पोहोचेल, यात शंका नाही.
– सुरिंदर जैन
अखिल भारतीय सराफा संघटनेचे उपाध्यक्ष.

यंदाच्या धनत्रयोदशीला सोन्याचा तोळ्याचा दर ३२,५०० रुपये राहू शकतो. या दिवशीच्या मुहूर्त खरेदीमुळे सराफ दुकानदारही मौल्यवान धातूचा साठा मोठय़ा प्रमाणात करून ठेवत असतात.
– पृथ्वीराज कोठारी
बॉम्बे बुलियन असोसिएशनचे अध्यक्ष.