देशातील निधीचा ओघ विस्तारण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीबाबतच्या नियमात शिथिलता आणण्याची तयारी केंद्र सरकारने गुरुवारी दाखविली. अनिवासी भारतीयांची गुंतवणूक सुलभ होण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे सोपी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याबद्दलचे सविस्तर स्पष्टीकरण लवकरच केले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थ व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने अनिवासी भारतीयांकडून होणाऱ्या गुंतवणुकीबाबतच्या थेट विदेशी गुंतवणूक अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. भारतीय नागरिकत्व असलेल्या मात्र विदेशात राहणाऱ्यांमार्फत देशात रुपयांमध्ये होणारी गुंतवणूक ही विदेशी गुंतवणूक म्हणून गृहीत धरली जात नाही.