पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून देशवासीयांना ग्वाही
गरिबांच्या ताटातील जेवळ महाग होणे आपल्याला चालणार नसून महागाईचा दर ६ टक्क्य़ांवर जाऊ दिला जाणार नाही; पोलिसांपेक्षाही अधिक प्रमाणात भीती असलेल्या प्राप्तिकर दात्यांमधील अधिकाऱ्यांबाबतचा कर दहशतवाद संपविण्यास आपण प्राधान्य देऊ, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे दिली.
सोमवारी नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी आपले सरकार हे संवेदनशील, जबाबदार, विश्वासार्ह, पारदर्शी तसेच परिणामकारक असून स्वराज्य ते सुराज दरम्यानचा प्रवास ते नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
सरकार म्हणून लोकप्रिय घोषणा करणे ही यापूर्वी राहिलेल्या परंपरेपासून मला दूर राहणेच अधिक पसंत असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सुधारणा, सादरीकरण आणि परिवर्तन ही त्रिसूत्री त्यांनी यावेळी विशद केली.
रुग्णालयांमधील प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, त्वरित प्राप्तीकर परतावा, जलद कंपनी नोंदणीकरण, गतिशील पारपत्र विवरण आदी निर्णयांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. ग्रामीण भागातील रस्ते रुंदीकरण तसेच ऊर्जानिर्मितीतील वाढीची प्रगतीही त्यांनी यावेळी मांडली. सरकारच्या दोन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला.
महागाई ६ टक्क्य़ांच्या आतच
काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा नामोल्लेख टाळत यापूर्वी दोन अंकी आकडय़ात असणारी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या सरकारने प्रयत्न केल्याचे नमूद करत मोदी यांनी महागाईचा दर ६ टक्क्य़ांवर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. गरिबांचे जेवण महाग होणे आपल्याला चालणार नाही, असेही ते म्हणाले. भाज्यांच्या वाढलेल्या किंमतीला यापूर्वीच्या मान्सूनची कमतरता जबाबदार असून चिंताजनक बनलेल्या डाळींच्या वाढत्या किंमतीवर यंदा लागवड क्षेत्र १.५ पटीने वाढविण्याचा उतारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कर दहशतवाद संपविणार
करदात्यामध्ये निर्माण झालेली व्यवस्थेविषयीची भीती नाहीशी करून छुपा कर दहशतवाद नाहीसा केला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. पोलिसांपेक्षाही अधिक त्रास मध्यम तसेच उच्च मध्यमवर्गीयांना प्राप्तीकर अधिकाऱ्यांमार्फत होतो, असे नमूद करत याबाबत आपण स्वत: लक्ष घालत असून लवकरच हे चित्रही बदलेल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रस्तावित वस्तू व सेवा कर रचनेच्या अंमलबजावणीमुळे अधिक बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.