तिसऱ्या टप्प्यातील कोळसा लिलाव प्रक्रिया येत्या ऑगस्टमध्ये पार पडणार आहे. ११ ते १७ ऑगस्टदरम्यान होणारा हा लिलाव १० खाणींसाठी असेल. ८५८.१९ दशलक्ष टन कोळसा हा स्टील, सिमेंट आणि ऊर्जा प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
आतापर्यंत झालेल्या दोन टप्प्यांतील लिलाव प्रक्रियेत २९ कोळसा खाणींसाठी बोली लावली गेली. या माध्यमातून सरकारने २ लाख कोटी रुपये जमा केले. ही रक्कम लिलाव न झाल्यामुळे ‘कॅग’ने अंदाजलेल्या  १.८६ लाख कोटी रुपयांच्या सरकारच्या नुकसानाला बरोबर ठरविणारीच आहे. ११ ते १७ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या यंदाच्या कोळसा खाणींच्या लिलावासाठी ८ जून रोजी सूचना जारी केली जाईल व २१ जूनपर्यंत कागदपत्रे जमा करून घेतली जातील, अशी माहिती कोळसा सचिव अनिल स्वरूप यांनी गुरुवारी दिली. खाण लिलावात यशस्वी सहभागींबरोबर ३१ ऑगस्टपर्यंत करारही करण्यात येतील, असेही ते म्हणाले. नव्याने लिलाव होणाऱ्या १० खाणी या अनियमन क्षेत्रातील असून स्टील, सिमेंट, ऊर्जा प्रकल्पांकडून त्यासाठी मागणी असते, असे निरिक्षण स्वरूप यांनी नोंदविले. महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड व ओडिशा राज्यांत ३५६.२४५ दशलक्ष टन कोळसा असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. १० खाणींपैकी दोन व सहा अशा खाणींसाठी स्वतंत्र लिलाव होईल.  यंदा होणाऱ्या १० पैकी पाच खाणी पहिल्या दोन टप्प्यांत विकल्या गेल्या नव्हत्या. हे दोन्ही टप्पे चालू वर्षांच्या सुरुवातीलाच पार पडले होते. दोन्ही टप्प्यांमध्ये राबविण्यात आलेली लिलाव प्रक्रियाच यंदाही होणार आहे. लिलावासाठीची किंमत लवकरच जाहीर केली जाणार आहे.