जीएसटीकपातीपश्चात ग्राहकोपयोगी विद्युत उपकरणे १० टक्क्यांपर्यंत स्वस्त

वस्तू व सेवा कराच्या नव्याने बदलेल्या टप्प्याचा लाभ खरेदीदारांना शुक्रवारपासून देऊ करताना विद्युत उपकरण निर्मात्यांनी १० टक्केपर्यंत वस्तू स्वस्त केल्या आहेत.

गेल्या आठवडय़ात झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या बैठकीत सर्वोच्च, २८ टक्के कर गटातील वस्तूंची संख्या अवघी ३५ करण्यात आली होती. या अंतर्गत टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्र, कपडे धुण्याचे यंत्र आदी उपकरणांवरील वस्तू व सेवा कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला होता. नवा कर टप्पा बदल २७ जुलैपासून लागू होईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

यानुसार कंपन्यांच्या विद्युत उपकरणांच्या किंमती १० टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत. गोदरेज अप्लायन्सेसची विद्युत उपकरणे १० टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्यात आल्याची घोषणा कंपनीचे व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांनी शुक्रवारी केली. कमी झालेल्या करांचा लाभ आम्ही ग्राहकांना देऊ करीत असल्याचेही ते म्हणाले.

दमदार मान्सून, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा सातवा वेतन आयोग यामुळे यंदाच्या सण मोसमात विक्री १२ ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही नंदी यांनी व्यक्त केली. कंपनीही या जोरावर यंदाच्या वर्षांत २० टक्के वाढीचे लक्ष्य सहज पार करेल, असेही त्यांनी नमूद केले. वातानुकूलन यंत्र मात्र अद्यापही २८ टक्के कर टप्प्यात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. निदान ऊर्जा बचत करणारी यंत्रे तरी कमी कर टप्प्यात असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आघाडीची विद्युत उपकरणनिर्मिती कंपनी सॅमसंगनेही तिच्या विविध उत्पादनांच्या किमती ८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये दूरचित्रवाणी संच, शीतकपाट यांचा समावेश आहे. या दरकपातीमुळे यंदाच्या सणांमध्ये कंपनीची विक्री वाढेल, असा विश्वास कंपनीच्या या विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव भुटानी यांनी व्यक्त केला आहे. एलजी, पॅनासॉनिक कंपन्यांनीही याच प्रमाणात त्यांच्या काही उपकरणांच्या किमती कमी केल्याचे जाहीर केले आहे.

सर्वोच्च कर टप्पा केवळ ऐषारामी वस्तूंसाठीच – जेटली

महसूल जसजसा वाढत जाईल तसतशा आणखी वस्तू कमी कराच्या टप्प्यात येतील, असा विश्वास व्यक्त करतानाच सध्याच्या सर्वोच्च अशा वस्तू व सेवा कराचा स्तर नजीकच्या दिवसांमध्ये केवळ ऐषारामी, चैनी वस्तूंकरिता लागू असेल, असे संकेत दिले. दूरचित्रवाणी संच, वातानुकूलित यंत्रे, सिमेंट यांच्यावरील अप्रत्यक्ष कर आणखी कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले. काँग्रेस सरकारच्या कालावधीत गृहोपयोगी वस्तूंवर ३१ टक्क्यांपर्यंत कर होता; गेल्या वर्षभरात ३८४ वस्तूंचे कर कमी करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.