सरकारला महसुली दिलासा..

सलग दोन महिन्यांपासून घसरत असलेले वस्तू व सेवा कर संकलन २०१७ च्या अखेरच्या महिन्यात मात्र पूर्वपदावर राहिले. डिसेंबरमध्ये ८६,७०३ कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष कर सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. या नव्या यंत्रणेच्या करदात्यांची संख्या एक कोटींवर गेली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने ट्वीटद्वारे यंदाची आकडेवारी जाहीर केली.

ऑक्टोबर २०१७ पासून सलग दोन महिने जीएसटी संकलनात घसरण नोंदली गेली. नोव्हेंबरमध्ये ८०,८०८ कोटी रुपयांचा कर जमा झाला, तर आधीच्या महिन्यात तो ८३,००० कोटी रुपये होता. जीएसटी प्रणालींतर्गत २४ जानेवारीअखेपर्यंत एक कोटी करदात्यांनी नोंदणी केल्याची माहितीही सरकारने दिली आहे. पैकी १७.११ लाख करदाते हे ‘कम्पोझिट योजने’चे लाभधारक आहेत. त्यांना केवळ तिमाही विवरणपत्र भरावे लागते. जुलै ते सप्टेंबर या पहिल्या तिमाहीत विवरणपत्र भरणाऱ्याकरिता २४ डिसेंबर ही मुदत होती. त्यांच्याकडून ३३५.८६ कोटी रुपयांचा कर आणि ८.१० लाख परतावे दाखल झाले आहेत.

‘जीएसटीआर ३बी’ विवरण पत्र भरणाऱ्यांची संख्या ५६.३० लाखांवर गेली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानच्या तिमाहीकरिता विवरणपत्र दाखल करावयाची अंतिम तारीख १८ जानेवारी होती. असे ४२१.३५ कोटी रुपयांचे ९.२५ लाख विवरणपत्रे दाखल झाले.

१ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात ९४,०६३ कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये ते घसरून ९०,६६९ कोटी रुपये झाले. सप्टेंबरमध्ये ते पुन्हा वाढले. मात्र त्यानंतर सलग दोन महिन्यात घसरण राहिली. गेल्या सहा महिन्यांपैकी सप्टेंबर व डिसेंबर वगळता कर संकलन आधीच्या महिन्याच्या तुलनेत घसरते राहिले आहे.

एक कोटींहून अधिक अप्रत्यक्ष करदाते