रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणाविरोधात आंदोलन

मुंबई : पंजाब- महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचे निमित्त करून देशातील सहकारी बँकाच मोडीत काढण्याचा घाट रिझव्‍‌र्ह बँकेने घातल्याचा आरोप करून महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनने त्याविरोधात शनिवारी, १८ जानेवारीला ‘हात जोडो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी गुरुवारी ‘हात जोडो’ आंदोलनाची माहिती दिली.

नागरी सहकारी बँकाच मोडीत काढण्याचा घाट रिझव्‍‌र्ह बँकेने घातला आहे. त्याचाच एक भाग म्हणून थकीत कर्जाचे प्रमाण वाढविण्याची धमकी देऊन या बँकांवर व्यापारी बँकेत रूपांतरित होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप अनास्कर यांनी केला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या दबावामुळेच न्यू इंडिया को- ऑप. बँक व्यवस्थापनाने या बँकेचे व्यापारी बँकेत रूपांतर करण्याचे मनसुबे रचले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

सहकारी बँका वाचविण्यासाठी येत्या शनिवारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेप्रसंगी ‘हात जोडो’ आंदोलन करण्यात येईल, असे फेडरेशनतर्फे सांगण्यात आले.

प्रत्येक बँकेने व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याबाबतच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणास तीव्र विरोध करण्याचा निर्णय राज्यातील नागरी सहकारी बँकांनी घेतला आहे. प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर रिझव्‍‌र्ह बँकेच्या दबावाला बळी पडून व्यापारी बँकेत रूपांतर करण्याचा निर्णय कोणत्याही नागरी सहकारी बँकेने घेऊ नये, तसेच सभासदांनीही या निर्णयास पाठिंबा देऊ नये यासाठी राज्यभर हात जोडो आंदोलन करण्यात येणार असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

व्यावसायिक अपयशामुळे आतापर्यंत एकही सहकारी बँक अडचणीत आलेली नाही. ज्या बँका अडचणीत आल्या त्या संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी रिझव्‍‌र्ह बँक नागरी सहकारी बँकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून व्यापारी बँकेत रूपांतरित होण्यास भाग पाडत आहे, असा आरोप फेडरेशनने केला आहे.

काही दिवसांपूर्वीच रिझव्‍‌र्ह बँकेने  उत्तर प्रदेशातील शिवालिक सहकारी बँकेला निकषात बसत नसतानाही व्यापारी बँकेत रूपांतरित होण्यास मंजुरी दिली.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या दबावाला बळी पडत न्यू इंडिया को- ऑप. बँकेनेही व्यापारी बँकेत रूपांतरीत होण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे, असे फेडरेशनने सांगितले.

घडले काय?

पीएमसी बँकेतील गैरव्यवहाराच्या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेने नागरी सहकारी बँकांबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. सहकारातील कीड नष्ट करण्याऐवजी सहकारालाच संपविण्याच्या हेतूने नागरी सहकारी बँकांवर कडक र्निबध लादण्यास सुरुवात केली आहे. या बँकांच्या कर्जवाटपावर र्निबध आणण्यात आले असून प्रत्येक बँकेला व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिल्याने नागरी बँकांमध्ये खळबळ उडाली आहे.