५५१ कोटींच्या बदल्यात एचडीएफसी अर्गोकडे ताबा
अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने सामान्य विमा व्यवसायातून पाय मागे घेतला असून याच क्षेत्रातील स्पर्धक कंपनी एचडीएफसी अर्गोने त्यावर ताबा मिळविला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ४८३ कोटींचे हप्ता संकलन नोंदविणाऱ्या एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनीचा हा ताबा व्यवहार ५५१ कोटी रुपयांमध्ये पार पडला आहे.
एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनी ही सामान्य विमा व्यवसायतील उपकंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो समूहाने सहा वर्षांपूर्वी स्थापित केली. समूहाने कोणत्याही विदेशी भागीदाराशिवाय प्रथमच या व्यवसायात शिरकाव केला होता. आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ४८३ कोटी रुपयांचे विमा संकलन नोंदविणाऱ्या या कंपनीने वार्षिक तुलनेत ४० टक्के वाढ नोंदविली आहे. विविध २८ कार्यालये असलेल्या एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनीत ८०० हून अधिक कर्मचारी आहेत.
एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या शुक्रवारी येथे झालेल्या संचालक मंडळच्या बैठकीत एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनी खरेदीबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. याद्वारे कंपनीने स्पर्धक कंपनीवर १०० टक्के मालकी मिळविली आहे. एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्सला एचडीएफसी अर्गोमध्ये विलीन करून करून घेण्याबाबत विमा नियामक(आयआरडीएआय)कडे परवानगी मागितली आहे.
एल अ‍ॅण्ड टी जनरल इन्शुरन्सवर ताबा मिळाल्याने एचडीएफसी अर्गोला आपले या क्षेत्रातील स्थान अधिक भक्कम करता येईल, असा विश्वास यानिमित्ताने एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केला आहे. एचडीएफसी आणि जर्मनीतील म्युनिच रे समूहातील अर्गो यांची एकत्रित सर्वसाधारण विमा कंपनी भारतात या क्षेत्राच चौथ्या स्थानावर आहे. व्यवहार तडीस नेण्यासाठी एचडीएफसी अर्गोला आर्पवूड कॅपिटलने मार्गदर्शन केले आहे.