सेबीच्या सांख्यिकीचा निष्कर्ष

बाजाराच्या वाढत्या निर्देशांकांच्याबरोबर व्यक्तीगत गुंतवणूक सेवा (पीएमएस) देणारयांच्या मालमत्तेत सुद्धा वेगाने वाढ झाल्याचे सेबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार निदर्शनास आले आहे.
३१ मार्च २०१६ रोजी सेबीच्या आकडेवारीनुसार ४६,०८८ गुंतवणूकदारांनी पीएमएस सेवेच्या अंतर्गत 10,45,428 कोटी रुपये गुंतविले असल्याचे दिसून आले आहे. अनेक उच्च धनसंपदा बाळगणारे गुंतवणूकदर समभाग गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाच्या बरोबरीने व्यक्तीगत गुंतवणूक सेवा देणारयाची निवड करण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. टाटा म्युच्युअल फंड एलआयसी म्युच्युअल फंड सुंदरम म्युच्युअल फंड या सारखे म्युच्युअल फंड स्वतंत्र निधीव्यवस्थापक व अनेक दलालीपेढ्या आपल्या गुंतवणूकदारांना ही सेवा पुरवीत असतात.
‘सेबी’ने एप्रिल महिन्याच्या जाहीर केलेल्या सांख्यिकीनुसार पीएमएसच्या परताव्याचा दर ९२% म्युच्युअल फंडाच्या योजनांच्या परताव्याच्या दराहून अधिक असल्याचे या सांख्यिकीत दिसून आले आहे.
‘वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या बरोबरीने अनेक कौटुंबिक न्यास, शैक्षणिक संस्था केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्था यांनी आमच्या पीएमएस मध्ये गुंतवणूक केली आहे,’ असे एलआयसी म्युच्युअल फंडाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पीएमएस व म्युच्युअल फंड गुंतवणूक या मधील एक मुख्य फरक म्हणजे पीएमएसच्या अंतर्गत खरेदी केलेले समभाग त्या व्यक्तीच्या नावांवर असतात. जी व्यक्ती किंवा संस्था पीएमएसमध्ये गुंतवणूक करते तिच्या नावांने बँकेत डिमॅट व बचत खाते उघडून व्यवहार केले जातात; तर म्युच्युअल फंडात गुंतवणूकदाराकडे समभागाची मालकी नसून त्या फंडाच्या युनिट्सची मालकी असते. तसेच म्युच्युअल फंडाचा खर्च हा एकूण मालमत्तेच्या २.५-३.५% इतका असतो तर पीएमएस सेवादार आपल्या ग्राहकांना २.५% शुल्क आकारतो.
सेबीच्या नियमानुसार कुठल्याही एका समभागात ५% पेक्षा अधिक गुंतवणूक करता येत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडात किमान २५ समभाग असलेल्या योजना आहेत
‘पीएमएस मध्ये हे बंधन नसल्याने समभागांची संख्या मर्यादित राखता येत असल्याने व चांगला परतावा मिळविण्यासाठी १२-१५ समभागपुरेसे असल्याने समभागांचे अनावश्यक वैविध्य टाळता येते. साहजिकच पीएमएसच्या परताव्याचा दर हा म्युच्युअल फंडापेक्षा अव्वल असतो,’ असे प्रभुदास लिलाधर या दलाली पेढीच्या पीएमएस सेवेचे प्रमुख अजय बोडके यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
बोडके म्हणाले की, तुमचा पीएमएस व्यवस्थापक हा तुमचा वैयक्तिक निधी व्यवस्थापक असतो. तुमच्या गरजा व तुमची जोखीम स्वीकारण्याची क्षमता लक्षात घेऊन गुंतवणूक करत असतो. त्यामुळे उच्च धन संपदा बाळगणारे गुंतवणुकदार म्युच्युअल फंडापेक्षा पीएमएस सेवेची निवड करतात.
कर कार्यक्षमतेच्या दृष्टीनेसुद्धा पीएमएस सेवा म्युच्युअल फंडापेक्षा अधिक सोयीची असते. गुंतवणूकदाराच्या वतीने केलेली समभागाची खरेदी किंवा विक्री थेट त्याच्या खात्यातून होत असल्याने अल्पमुदतीच्या किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याचा लाभ गुंतवणुकदार त्याच्या गरजेनुसार करून घेऊ शकतो. वाढत्या मालमत्ता सोबतच सेबीने पीएमएसवर कठोर नियंत्रणे लादली आहेत.
अनेक दलाली पेढ्यांनी पीएमएसचा गरवापर केल्याने किमान गुंतवणुकीची मर्यादा १० लाखावरून 25 लाखांवर नेली आहे. ही सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांची पडताळणी केल्या नंतर त्यांचे खाते उघडून होणारया व्यवहारांवर सेबीचे लक्ष असून दरमहा सेबीला व ग्राहकाला होणारया व्यवहारांची माहिती देणे बंधनकारक असल्याचे एलआयसी म्युच्युअल फंडाच्या या अधिकाऱ्याने सांगितले. या नियमांचे पालन न करणाऱ्याचा पीएमएस परवाना रद्द केल्याच्या घटना घडल्याची आठवण या अधिकाऱ्याने करून दिली.