देशात रस्ते सुरक्षेबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटरतर्फे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील सहाव्या वाहतूक उद्यान साकारण्यात आले आहे. होंडा आणि येवला इंडस्ट्रिअल को-ऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्य़ातील येवला येथे हे वाहतूक उद्यान सुरू करण्यात आले असून या दोन्ही संस्था उद्यानकार्यान्वित आणि त्याची देखभाल करणार आहेत. या नवीन वाहतूक उद्यानाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी येवला इंडस्ट्रिअल को-ऑपरेटिव्ह इस्टेटचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटरच्या पश्चिम विभागाच्या विक्री विभागाचे सहायक सर व्यवस्थापक श्रीनाथ कमलापूरकर उपस्थित होते. यावेळी होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटरच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष यादिवदर एस. गुलेरिया यांनी, दुचाकी चालकांना वाहन चालविताना सुरक्षेची सवय व्हावी या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल या पार्कच्या निमित्ताने टाकले जात असल्याचे नमूद केले. देशातील सुजाण नागरिकांच्या साथीने होंडातर्फे कायम वाहन चालकांना सुरक्षित प्रवासासाठी शिक्षित करण्यासाठी गुंतवणूक केली जाईल, असेही ते म्हणाले. श्रीनाथ कमलापूरकर म्हणाले, प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी सुरक्षित शिक्षणपर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. होंडातर्फे महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सीआरएफ ५० मोटरसायकल आयात करण्यात आल्या आहेत. होंडाने देशभरातील चार वाहतूक उद्यानामध्ये ६० हजार जणांना प्रशिक्षित केले आहे. यात जयपूर, दिल्ली, भुवनेश्वर आणि कटक येथील ट्रेिनग पार्कचा समावेश आहे. तसेच यापूर्वी चंडीगडमध्ये वाहतूक उद्यान  स्थापन करण्यासंबंधी होंडाने चंडिगड वाहतूक पोलिसांसोबत सामंजस्य करार केला आहे.

Honda India Inaugurates First Traffic Park In Maharashtra