महाराष्ट्राच्या शहरी भागात प्रति दिन अवघ्या दोन डॉलरमध्ये (१३५ रुपयांत) हॉटेल वास्तव्य ही ‘बजेट हॉटेल’मधील अनोखी संकल्पना साकारात असून छोटोटेल हा या क्षेत्रातील नवा समूह मुंबईनजीक आदरातिथ्य सेवा देण्यासाठी सज्ज झाला आहे. या अंतर्गत छोटोटेल हॉटेल मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील १.५ एकर जागेवरील २४० खोल्यांचे हॉटेल जूनअखेपर्यंत सुरू करत असून त्यासाठी १७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
मूळच्या लंडन येथील व तिसऱ्या फळीतील उद्यमशील व्यक्तिमत्त्व म्हणून रिया सिल्वा या छोटोटेलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने पुढे आल्या आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी ‘दोन डॉलरमध्ये हॉटेल सेवा’ आकारास आली असून असे पहिले हॉटेल नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ परिसरात थाटण्यात येणार आहे.
अन्य तारांकित हॉटेलप्रमाणेच येथेही त्याच धर्तीची सेवा देणे शक्य असून त्यासाठी पाण्याचा पुर्नवापर, आवश्यक तेवढाच विजेचा उपयोग या माध्यमातून एवढय़ा स्वस्त दरात आदरातिथ्य सेवा देणे सहज शक्य होणार आहे, असे रिआ सिल्वा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. छोटोटेलचे येत्या पाच वर्षांत विविध हॉटेल मालमत्ताद्वारे एकंदर एक लाख खोल्यांचा मनोदय असल्याचेही रिया म्हणाल्या.
नागोठणे, रोहे हा औद्योगिक परिसर लक्षात घेऊनच संबंधित भागात कर्मचारी, कामगारांसाठी उपयुक्त माफक दरातील आदरातिथ्य सेवा त्यांना पुरविण्याच्या हेतूने या व्यवसायाची आखणी करण्यात आल्याचेही रिया यांनी सांगितले. नजीकच्या भविष्यात मुंबईबरोबरच पुणे (चाकण), गोवा (पणजी), गुजरात (सूरत) आदी शहरांनजीक व्यवसाय विस्तार करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.