04 March 2021

News Flash

‘एसएमई भागविक्री’चे मूल्यांकन कसे कराल?

उच्च लाभ आणि उच्च जोखीम हे समभागांतील गुंतवणुकीचे अभिन्न लक्षण आहे. कंपनीच्या प्रवर्तकाच्या दृष्टीने मात्र भागधारकांचा पैसा हा सर्वात सुरक्षित व सोयीचा स्रोत असतो, तर

| January 22, 2015 12:42 pm

उच्च लाभ आणि उच्च जोखीम हे समभागांतील गुंतवणुकीचे अभिन्न लक्षण आहे. कंपनीच्या प्रवर्तकाच्या दृष्टीने मात्र भागधारकांचा पैसा हा सर्वात सुरक्षित व सोयीचा स्रोत असतो, तर गुंतवणूकदारांबाबत हीच बाब नेमकी उलट असते. समभागातील गुंतवणुकीचा सर्वात मोठा जोखीम घटक कोणता? तर या गुंतवणुकीला आनुषंगिक हमी अथवा तारणाचे पाठबळ नसते, तसेच परताव्यासह गुंतवणूक केव्हा काढून घ्यावी याचे निश्चित वेळापत्रकही ठरलेले नसते. त्यामुळे कोणत्या भावाला समभाग खरेदी करावा आणि भविष्यात भाव वाढत जाईल, यासंबंधाने मूल्यांकनाचे काही निश्चित ठोकताळे आहेत, त्याची जुजबी माहिती तरी गुंतवणूकदारांना असायला हवी.
तथापि, हे ठोकताळे जरी असले तरी संक्रमणावस्थेत असणाऱ्या आणि देशाच्या उद्योगक्षेत्रात व अर्थकारणात प्रचंड योगदान असलेल्या छोटय़ा व मध्यम कंपन्या ज्यांना आपण ‘एसएमई’ अशा संक्षिप्त नावाने संबोधतो, त्यांच्यासाठी हे गैरलागू ठरतात. मूळातच एसएमई समभागांतील जोखीम घटक हा अनेकांगाने मोठा व वेगळा आहे. या पाश्र्वभूमीवर एसएमई कंपन्यांच्या प्रारंभिक भागविक्री (आयपीओ)साठी अर्ज करताना, कंपनीने दिलेले प्रॉस्पेक्टस आणि कंपनीचे अधिकृत निवेदन हाच सर्वात महत्त्वाचा माहितीस्रोत ठरतो. पण याव्यतिरिक्त मूल्यांकनाचे जे निकष बडय़ा कंपन्यांच्या भागविक्रीसाठी वापरात येतात, ते जसेच्या तसे वापरून आकडेमोड आणि गुणोत्तरांचे विश्लेषण या ठिकाणी शहाणपणाचे ठरणार नाही. कारण १०,००० कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीला वर्षांगणिक सरासरी २० टक्के दराने विकास साधणे निश्चितच
आव्हानात्मक असते, त्या उलट जेमतेम १० कोटींची उलाढाल असणाऱ्या नवस्थापित एसएमई कंपनीने दरसाल ५० टक्क्यांच्या दराने प्रगती करणे तितकेसे अवघड आणि आश्चर्यकारकही नसेल.
म्हणूनच कंपनीचे व्यवसाय प्रारूप आणि प्रवर्तकांची पाश्र्वभूमी हा मग एसएमई समभागांतील गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयाचा दुसरा महत्त्वाचा पैलू ठरतो. कंपनी ज्या व्यवसायात आहे त्याला भविष्यात वाढीच्या शक्यता किती याचा गुंतवणूकदाराला अंदाज असायला हवा. त्यासाठी त्या उत्पादन व सेवा क्षेत्रातील प्रस्थापित कंपन्या, त्यांचा व्याप व वाढीचा दर, बाजारहिस्सा, बाजारातील मागणी व पुरवठय़ाची ताजी स्थिती, नव्या कंपन्यांच्या प्रवेशाला अडसर ठरणाऱ्या गोष्टी आणि या सर्व पैलूंच्या तुलनेत आपण अभ्यासत असलेल्या कंपनीचे वेगळेपण तपासले पाहिजे.
कोणत्याही व्यवसायाचे यशस्वी सारथ्य हे सक्षम प्रवर्तकांकडून होत असते आणि त्यांच्या सद्हेतूनेच त्या व्यवसायाचा विस्तार व प्रगती होत असते. त्यांनी निवडलेल्या व्यवसायाचे प्रारूप हे कागदावर खूपच लोभस आणि नवीन संधीकडे खुणावणारे व प्रथितयश भासत असले, तरी तो चालविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे, त्या प्रवर्तकाची क्षमता व नियतच सर्वाधिक महत्त्वाची असते. त्यासंबंधाने त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण, पूर्वानुभव, कुटुंबाकडून आलेला वारसा, त्यांचे स्वत:चे व कुटुंबाचे अन्य व्यवसायांतील स्वारस्य व सहभाग, प्रवर्तकाने नियुक्त केलेला व्यवस्थापकीय संघ वगैरेची माहिती प्रस्ताव अर्जात असतेच, ती नजरेखालून घातली पाहिजे.
त्या व्यवसायाचा वर्तन आकृतिबंधही अभ्यासला पाहिजे. म्हणजे कंपनीवरील आणि व्यक्तिश: प्रवर्तकांवरील कर्जदायित्व आणि एकूण ऋणपात्र विश्वासार्हता पाहायला हवी. धनको संस्था (बँका, वित्तसंस्था वगैरे), वितरक-विक्रेते, पुरवठादार यांच्या संबंधाने काही वादंग असल्यास त्याची औपचारिक माहिती कंपनीला ‘जोखीम घटका’त नमूद करून भागविक्रीच्या प्रस्ताव दस्तावेजात गुंतवणूकदारांसाठी खुली करणे बंधनकारकच असते. यातून त्यांच्या उत्पादन-सेवेला मागणी, त्याची नियमित डिलिव्हरी, कार्यक्षमता व विश्वासार्हतेची आपोआपच खातरजमा होईल. नमूद ‘जोखीम घटकां’ना कंपनीच्या व्यवस्थापनाचा प्रत्युत्तरादाखल प्रतिसादही तपासला पाहिजे.
सारांशात, एसएमई समभागांत गुंतवणूक ही उच्चतम जोखमीची असली तरी दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांना सर्वोत्तम परतावा देणारी ती एक संधीही असल्याचे नि:संशय म्हणता येईल. शहाण्यासुरत्या गुंतवणूकदाराने गणिती आकडेमोडीवर विसंबून राहून गुंतवणूकविषयक मूल्यांकन करण्यापेक्षा, व्यावहारिक अंगाने व प्रत्यक्ष वर्तन पाहून निर्णय घेणे केव्हाही चांगले. त्यासाठी गुंतवणुकीसाठी जो व्यवसाय, उत्पादन, सेवा क्षेत्र निवडले, ते सोपे, सवयीचे, स्वपरिचित तरी हवे अथवा त्यासाठी स्वत: अभ्यास करून  अंदाज घेण्याची तसदी तरी घेतली गेली पाहिजे.

एसएमई जोखीम घटक असे:
१.    या कंपन्यांचा व्यावसायिक पसारा आणि व्याप छोटा असणे
२.    भांडवलासह अनेक संसाधनांची कमतरता
३.    प्रवर्तकांच्या पूर्वकामगिरीसंबंधी माहितीचा अभाव व अनभिज्ञता
४.    व्यवसायसंलग्न जोखीम झेलून तरून जाण्याची क्षमता
५.    नियम-कानूंशी अनुरूपता आणि कारभाराची (विस्कळीत) चौकट.
(लेखक पेंटामाथ कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्स  कंपनीचे समूह व्यवस्थापकीय संचालक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 12:42 pm

Web Title: how to do evaluation smes sales
Next Stories
1 जैवतंत्रज्ञान उद्योगाच्या उत्कर्षांत मका महत्त्वाचा!
2 उद्यापासून कमलनयन बजाज जन्मशताब्दी वर्ष उपक्रम
3 निर्देशांकांचे नवे उच्चांकी शिखर
Just Now!
X