‘व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन’कडून ‘फोर स्टार’ मानांकन

मुंबई : म्युच्युअल फंडाची पतनिश्चिती करणाऱ्या व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईनने आयडीबीआय निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स फंडाला ‘फोर स्टार’ मानांकन बहाल करून फंडाच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे. आयडीबीआय निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स फंड हा २० सप्टेंबर २०१० रोजी गुंतवणुकीस खुला झाला असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स या सुचकांकानुसार गुंतवणूक करणारा फंड आहे.

फंडाचे निधी व्यवस्थापन फिरदोस मर्झबान रागिना यांच्याकडे आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स’ निर्देशांकात निफ्टी १०० निर्देशांकातील ‘निफ्टी फिफ्टी’मधील कंपन्या वगळून उर्वरित कंपन्यांचा समावेश होतो.

कंपन्यांच्या नफा वृद्धीचा दर निफ्टी फिफ्टी निर्देशांकातील कंपन्यांच्या नफा वृद्धीदराहून अधिक असल्याने गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी पसंती नेक्स्ट फिफ्टी इंडेक्समधील समभागांना देतात. इंडेक्स फंड गटातील आयडीबीआय निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स फंड ५ वर्षांच्या कामगिरीच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावरील फंड आहे.

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडचा स्मॉल कॅप फंड

कॅनरा रोबेको अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने कॅनरा रोबेको स्मॉक कॅप फंड या खुल्या योजनेसाठी नवीन फंड प्रस्तावाची (एनएफओ) घोषणा केली आहे. अन्य इक्विटी वर्गाच्या तुलनेत दीर्घकाळामध्ये अधिक मोबदला मिळवून देण्याची क्षमता असलेल्या स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये स्मॉल कॅप कंपन्या या भविष्यकाळातील संभाव्य मिड/लार्ज कंपन्या समजल्या जातात. एनएफओ ८ फेब्रुवारी रोजी बंद होणार आहे.