पायाभूत क्षेत्राला अर्थसाहाय्यातील अग्रणी आयडीएफसी लि.ने परिपूर्ण बँक म्हणून सज्जतेसाठी सुरू असलेल्या पूर्वतयारीतून आपल्या नफ्यातील मोठय़ा हिश्शाला तिलांजली देणे भाग पडले आहे, असे कंपनीच्या ताज्या तिमाही निकालातून दिसून येते.
आयडीएफसीला सरलेल्या जुलै-सप्टेंबर २०१४ तिमाहीत २८१ कोटी रुपये वितरीत कर्जावरील जोखीम तरतुदीपोटी वेगळे काढावे लागले आहेत. आधीच्या वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत त्यात तब्बल ४५९ टक्क्यांनी (साडेचार पटीने) वाढ झाली आहे. या परिणामी कंपनीने तिमाहीत ४२१ कोटी रुपयांचा नफा नोंदविला असून, जो आधीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी घटला आहे.
सर्व वित्तीय व्यवसाय हे विद्यमान कंपनीतून विभाजित अंग म्हणून पुढे येणाऱ्या प्रस्तावित बँकेकडे वर्ग करण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना, असे घडणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी विक्रम लिमये यांनी केले. रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या वर्षी नव्या पिढीची परिपूर्ण खासगी बँक म्हणून दोन कंपन्यांना परवाना मंजूर केला त्यात आयडीएफसीचा समावेश आहे.
कंपनीचा मुख्य व्यवसाय असलेल्या पायाभूत क्षेत्रात आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत अपेक्षित चैतन्य दिसून आलेले नाही, अशी कबुलीही लिमये यांनी या वेळी बोलताना दिली. प्रस्तावित बँक म्हणून सज्जतेसाठी नवीन भरती सुरूच असून, निवडकांचे वरिष्ठ व्यवस्थापन कार्यरतही झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
टप्प्याटप्प्याने १५०० जणांची भरती
बँक म्हणून कार्यान्वयन सुरू करण्यासाठी आयडीएफसीकडून खर्चाचा भार एकदम वाढू नये म्हणून टप्प्याटप्प्याने भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकूण १५०० हून अधिक कर्मचारी बँक कार्यान्वयनापूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०१५ आधी घेतले जातील आणि यातील बहुतांश पुढील आर्थिक वर्षांत सामावले जातील.
ऑक्टोबर २०१५ ची मुदत पाळली जाईल
पुढील ११ महिन्यांत बँक म्हणून सज्जतेसाठी आवश्यक सर्व ती पूर्वकाळजी घेतली जात आहे. एक बँक बनून पुढे आल्यावर मालमत्ताविषयक म्हणजे वितरित कर्जाच्या गुणवत्तेविषयक कोणताही मुद्दा उपस्थित होऊ नये यासाठी आवश्यक तरतुदींची मात्रा वाढविणे; प्राधान्य क्षेत्राला कर्ज वितरण याबाबींवर लक्ष दिले जात आहे. कोणत्याही स्थितीत बँक म्हणून कार्यान्वयाची ऑक्टोबर २०१५ मुदत पाळली जाईल.