विकास दर अंदाज खालावून ६.१ टक्क्य़ांवर

वॉशिंग्टन : भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याचे स्पष्टपणे सूचित करीत, जागतिक बँकेपाठोपाठ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)नेही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराचा अंदाज खुंटविला आहे.

‘आयएमएफ’ने अर्थवृद्धी दर चालू वर्षांसाठी ६.१ टक्क्यांवर आणून ठेवताना पुढील वर्षांत तो ७ टक्के अंदाजला आहे. यापूर्वीचा या संस्थेचा अंदाज ६.४ टक्के होता. अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने तो ०.३ टक्क्यांनी खाली खेचण्यात आला आहे.

आयएमएफने एप्रिलमध्ये भारताच्या विकास दराबाबत ७.३ टक्के पूर्वअंदाज व्यक्त केला होता. आता मात्र तो थेट १.२ टक्क्यांनी सुधारून, कमी केला गेला आहे.

जागतिक बँकेने रविवारीच २०१९ मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा वेग ६ टक्के असेल, असे स्पष्ट केले. जागतिक बँकेचा विकसनशील देशाच्या प्रगतीचा यापूर्वीचा अंदाज ६.९ टक्के होता.

भारताचा २०२० मधील विकास दर ७ टक्के असेल, असे आयएमएफने म्हटले असले तरी तो आधीच्या अंदाजापेक्षा ०.५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.

भारताबाबत वाहन, स्थावर मालमत्तासारख्या क्षेत्रांच्या कमकुवत कामगिरीमुळे दुसऱ्या तिमाहीत विकासाचा वेग वाढण्याची शक्यता कमी असल्याचे आयएमएफचे म्हणणे आहे. ताज्या व बहुचर्चित बँकेतर वित्तीय कंपन्यांतील अस्थिरतेचाही तिने उल्लेख केला आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्तीला सरकारच्या योजना चालना देऊ शकतील, असे नमूद करतानाच जागतिक बँकेने कंपनी करातील कपात, व्याजदर कपात आदींमुळे अर्थव्यवस्था पुढील वर्षांत वाढ नोंदवू शकेल, असे म्हटले आहे.

भारताचा कट्टर स्पर्धक असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर भाष्य करताना आयएमएफने शेजारील देशाचा विकास दर २०१९ मध्ये ६.१ टक्के, तर २०२० मध्ये तो घसरून ५.८ टक्के होईल, असे आपल्या जागतिक आर्थिक आढाव्यात नमूद केले आहे.

भारत, चीनसह जगभरातील उदयोन्मुख देशांचा विकास दर २०१९ मध्ये ३.९ टक्के व २०२० मध्ये ४.६ टक्के असेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विकसित देशांचा विकास दर १.७ टक्के असेल, असे स्पष्ट करतानाच एकंद जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर एप्रिलमधील अंदाजापेक्षा ०.२ टक्के अधिक, ३.४ टक्के असेल, असे म्हटले आहे.