वार्षिक तुलनेत ‘सिप’च्या रकमेची सरासरी वाढली; ‘कॅम्स’च्या दफ्तरी कलनोंद

वैयक्तिक गुंतवणूकदारांमध्ये ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’ अर्थात ‘सिप’ दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून, म्युच्युअल फंडाच्या व्यवहाराचे काम पाहणाऱ्या ‘कॅम्स’ या संस्थेकडे जानेवारी-एप्रिल २०१६ या कालावधीत मागील वर्षांच्या तुलनेत ३२% वाढ झाली आहे.
म्युच्युअल फंड उद्योगापकी ६१% व्यवहारांचे ‘कॅम्स’ या संस्थेमार्फत होतात. जानेवारी-एप्रिल २०१६ या कालावधीत २९.८ लाख नवीन ‘सिप’ची गुंतवणूकदारांनी ‘कॅम्स’कडे नोंद आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २३.७ लाख नवीन ‘सिप’ची गुंतवणूकदारांनी नोंद केली होती. यावर्षी ‘सिप’च्या सरासरी रक्कम ३,३६८ वरून वाढून ३,४५० वर पोहचली आहे.
ज्याप्रमाणे बँकेत आवर्ती योजनेत दरमहा ठरावीक रक्कम गुंतविली जाते, त्याप्रमाणे म्युच्युअल फंडात दर महिन्याला निश्चित रक्कम गुंतविण्याच्या पद्धतीला ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’ (‘सिप’) म्हणतात.
सुधारलेली आíथक परिमाणे व म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीविषयी जनमानसात आलेली सजगता हे या वाढीमागचे कारण असल्याचे मानण्यात येते. भारतीय जनता पक्षाने सप्टेंबर २०१३ मध्ये नरेंद्र मोदींचे नाव १६व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी झालेल्या निवडणुकीचे प्रचारप्रमुख म्हणून जाहीर केल्यापासून शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात वाढ होत आली आहे. सप्टेंबर २०१३ ते मार्च २०१५ राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त २९% वाढ झाली. याचा सकारात्मक परिणाम समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांना झाल्याचे मानले जाते. डीएसपी ब्लॅक रॉक मायक्रोकॅप फंडाने तीन वर्षांच्या कालावधीत ४०.७% परतावा दिला आहे.
स्मॉल कॅप योजनांचा मागील तीन वर्षांचा सरासरी वार्षकि परतावा ३१%, तर मिड कॅप योजनांचा मागील तीन वर्षांचा सरासरी वार्षकि परतावा २५% आहे. हा परतावा गुंतवणूकदारांना सिप करण्यास नक्कीच प्रोत्साहित करतो, असे दिसून आले आहे.
‘सीडीएसएल’च्या गुंतवणूकदार साक्षरता विभागाचे प्रमुख अजित मंजुरे म्हणाले की, म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत सुरू असलेल्या वाढीचे प्रतििबब डीमॅट रूपातील म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत दिसून येत आहे. समभाग नसलेल्या व केवळ म्युच्युअल फंडाचे युनिट्स असलेल्या आमच्या येथील डीमॅट खात्यांची संख्या आताच्या रोखे भांडारात ३१ मार्च २०१५ रोजी २.९८ लाख होती; हीच संख्या ३१ मार्च २०१६ रोजी ३.६१ लाख झाली असून, यापकी बहुसंख्य खात्यात म्युच्युअल फंडाची युनिट्स डीमॅट रूपात खरेदी होत आहेत. म्युच्युअल फंडांच्या ‘सिप’ खात्यांची संख्या वाढत आहे तशी रोखे भांडारात नवीन खाती उघडण्याच्या संख्येतही वाढ होत असल्याचे प्रतिपादन मंजुरे यांनी केले.

मोठय़ा संख्येने ‘सिप’ गुंतवणूकदार वाढविण्यात अर्थ साक्षरतेच्या बरोबरीने तंत्रज्ञानाचादेखील वाटा असल्याचे मानले जात आहे. सेबीने ‘ई केवायसी’ सुरू केल्याने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सुलभ झाले आहे. विविध म्युच्युअल फंडांचे स्वत:चे व वितरकांचे अ‍ॅप असून आता फंड गुंतवणूक एका टिचकीवर आले आहे.

भारतातील गुंतवणूकदार गुंतवणुकीबाबत परिपक्व होत असून, म्युच्युअल फंड उद्योगातून सध्या ९१,००० कोटी रुपये हे ‘सिप’च्या माध्यमातून त्यांच्यामार्फत गुंतविले जातात. चालू आíथक वर्षअखेरीपर्यंत या निधीत वाढ होऊन ही रक्कम एक लाख कोटी इतकी झाले असेल
– ए. बालसुब्रमण्यम, मुख्य कार्यकारी अधिकारी, बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड.