News Flash

बँकांकडे वाढता निधी ओघ; मात्र ठेवींदाराच्या व्याजलाभात घट!

खासगी बँकांनी तब्बल ०.२५ टक्क्यांनी व्याजदर कमी केले आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

चलनातून जुन्या ५०० व १,००० रुपये मूल्याच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँकांमध्ये निधीचा ओघ लक्षणीय वाढला आहे. परंतु याच कारणाने बँकांनी आता ठेवींवर ग्राहकांना देय व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी भारतीय स्टेट बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर ०.१५ टक्क्यापर्यंत कमी केल्यानंतर अन्य आघाडीच्या खासगी बँकांनी तब्बल ०.२५ टक्क्यांनी व्याजदर कमी केले आहेत.

खासगी क्षेत्रातील अग्रणी आयसीआयसीआय बँकेने ३९० दिवस ते दोन वर्षे मुदतीच्या ठेवींवरील वार्षिक व्याजदर ०.१५ टक्के कमी केले आहेत. बँकेचा नवा दर पूर्वीच्या ७.२५ टक्क्यांऐवजी आता ७.१० टक्के असा असेल.

एचडीएफसी बँकेने तिच्या सर्व कालावधीच्या मुदत ठेवींचे दर (१ ते ५ कोटी रुपये मर्यादेपर्यंतच्या) पाव टक्क्यापर्यंत कमी केले आहेत. बँकेचे एक वर्षांसाठीच्या मुदत ठेवींचे दर आता ७ टक्क्यांऐवजी ६.७५ टक्के असतील. तर ३ ते ५ वर्षे कालावधीकरिता ठेवींवरील व्याजदर वार्षिक ६.५० असा टक्के असेल.

दोन्ही बँकांची ठेवींच्या दरातील कपातीची अंमलबजावणी ही स्टेट बँकेप्रमाणेच शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने निवडक मुदत ठेवींचे दर ०.१५ टक्क्याने कमी केले आहेत. यानुसार बँकेच्या एक वर्ष ते ४५५ दिवसांच्या मुदत ठेवींवर आता वार्षिक ७.०५ टक्क्यांऐवजी ६.९० टक्के व्याज मिळेल. तर दोन ते तीन वर्षांसाठी ७ टक्क्यांऐवजी ६.८५ टक्के व्याज लागू असेल. बँकेने काही दिवसांपूर्वीच कर्जावरील व्याजदरही कमी केले होते.

निश्चलनीकरण मोहिमेनंतर, गेल्या आठ दिवसांत  स्टेट बँकेने १.१४ लाख कोटी रुपये जमा करून घेतले आहेत. संपूर्ण बँक क्षेत्रातून आतापर्यंतची गोळा झालेली ठेवीची  रक्कम ४ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारी असल्याचे सांगण्यात येते. तर ५० दिवस चालणाऱ्या या मोहिमेतून तब्बल १० लाख कोटी रुपयांचा रोखीत असलेला पैसा बँकेत जमा होणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:50 am

Web Title: increasing deposits in a bank
Next Stories
1 सेन्सेक्स घसरण सलग चौथ्या सत्रात कायम
2 हवाई क्षेत्रासाठी ‘कोलंबस’ दाखल
3 उत्पन्नातील अचानक वृद्धीही कर कचाटय़ात
Just Now!
X