सेन्सेक्स, निफ्टी पाचव्या सत्रातही खाली; गुंतवणूकदारांच्या ९.५६ लाख कोटींचा संपत्तीऱ्हास

परदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातून निधीओघ काढून घेण्याचा क्रम सलग पाचव्या सत्रातही कायम राहिला. समभागांच्या विक्रीदबावामुळे सेन्सेक्ससह निफ्टीने गुरुवारीही मोठी निर्देशांक आपटी नोंदवली.

बुधवारप्रमाणेच गुरुवारीही व्यवहारात जवळपास २ टक्क्यांनी घसरण अनुभवणाऱ्या प्रमुख निर्देशांक सत्रअखेर तुलनेत सावरले असले तरी बुधवारच्या प्रमाणात ते नरमलेच. गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांच्या वरच्या टप्प्यावरील समभागांची विक्री केली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारअखेर ५२३.५७ अंशांनी घसरून ४८,८७४.३६ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४९.९५ अंश घसरणीसह १३,८१७.५५ पर्यंत राहिला. दोन्ही निर्देशांकांनी त्यांचा अनुक्रमे अनोखा टप्पाही सोडला.

सेन्सेक्सने सत्रअखेर ४७ हजारांपासून तर निफ्टीने व्यवहारांती १४ हजारापासून फारकत घेतली. निफ्टीसह सेन्सेक्सने सलग पाचव्या सत्रात घसरण नोंदविली आहे. या दरम्यान मुंबई निर्देशांक २,९१७.७६ अंशाने खाली आला आहे.

गुरुवारच्या व्यवहारात मुंबई निर्देशांक ४६,६०० च्याही खाली आला होता. तर निफ्टी दुपारच्या सत्रादरम्यान १३,७०० नजीक, असा दिनतळाला होता. अत्यंत दोलायमान स्थितीनंतरही बाजाराची अखेर मोठय़ा घसरणीसच झाली.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपन्यांमध्ये हिंदुस्थान यूनिलिव्हर सर्वाधिक, ३.६५ टक्के घसरणीसह पुढे राहिला. तिसऱ्या तिमाहीत नफा तसेच विक्रीतील दुहेरी अंकातील वाढ नोंदवूनही समभाग मूल्यावर गुंतवणूकदारांचा विक्री दबाव राहिला.

याचबरोबर मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, पॉवरग्रिड, कोटक महिंद्र बँक, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, बजाज फिनसव्‍‌र्हही घसरले. तर अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंटचे मूल्य ६ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, वाहन, आरोग्यनिगा २

टक्क्यांपर्यंत घसरले. तर तेल व वायू, दूरसंचार, बँक, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप अर्ध्या टक्क्यापर्यंत घसरले.

भांवडली बाजारात गेल्या सप्ताहअखेरपासून सलग घसरण नोंदली जात आहे.

सलग पाचव्या व्यवहारात निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या मुंबईच्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती गुरुवारी ९.५६ लाख कोटी रुपयांनी कमी झाली. भांडवली बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल गुरुवार सत्रअखेर १८८.१३ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.