भारतीय भांडवली बाजाराचा सप्ताहअखेरचा प्रवास घसरणीने झाला. मात्र दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहवाढ नोंदविली. सेन्सेक्समध्ये शुक्रवारी शतकी अंश घसरण झाली. तर निफ्टी त्याच्या १३ हजारांखालील प्रवासापासून आणखी दूर गेला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहअखेरच्या व्यवहारात गुरुवारच्या तुलनेत ११०.०२ अंश घसरणीसह ४४,१४९.७२ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८.०५ अंश घसरणीने १२,९६८.९५ पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांक जवळपास पाव टक्क्याने खाली आले.

विक्रमी शिखर गाठणाऱ्या भांडवली बाजारात चालू सप्ताहात सेन्सेक्सने २६७.४७ अंश तर निफ्टीने १०९.९० अंश वाढ नोंदविली आहे. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे ०.६० व ०.८५ आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग विक्रीचा दबाव अधिक राहिला. सेन्सेक्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पॉवरग्रिड सर्वाधिक २.६३ टक्क्यांसह घसरला.

रुपयात घसरण

डॉलरच्या तुलनेत गेल्या सलग पाच व्यवहारांत तेजी नोंदविणारे स्थानिक चलन सप्ताहअखेरच्या व्यवहारात रोडावले. परकीय चलन विनिमय मंचावर रुपया तब्बल १७ पैशांनी आपटून ७४.०५ वर स्थिरावला. ७३.८० या भक्कम स्तरावर सुरू झालेला रुपयाचा शुक्रवारचा प्रवास सत्रात ७३.७६ पर्यंत भक्कम बनला. मात्र व्यवहारात त्याने ७४.०७ चा सत्रतळ नोंदविल्यानंतर गुरुवारच्या तुलनेत मोठी घसरण नोंदविली.