व्यापार तूटही उच्चांक गाठेल!

नवी दिल्ली : रुपयाच्या मूल्याने विक्रमी नीचांक पातळीवर गटांगळी घेतली असून, त्या परिणामी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये देशाची इंधनाची गरज भागवणाऱ्या खनिज तेलाच्या आयातीच्या खर्चात २६ अब्ज डॉलरने वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय देशांतर्गत पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीही वाढतील.

देशाची इंधनाची ८० टक्के गरज ही विदेशातून खनिज तेलाच्या आयातीद्वारे पूर्ण केली जाते. सरलेल्या २०१७-१८ आर्थिक वर्षांत २२०.४३ दशलक्ष टन खनिज तेलाच्या आयातीसाठी ८७.७ अब्ज डॉलर (५.६५ लाख कोटी रुपये) खर्च करण्यात आले. तर २०१८-१९ सालासाठी हा आयात खर्च १०८ अब्ज डॉलरवर जाईल, असा अंदाज सरकारी सूत्रांनी व्यक्त केला.

चालू वर्षांसाठी खनिज तेल आयातही वाढून २२७ दशलक्ष टनांवर जाणे अपेक्षित आहे. एकीकडे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती वधारल्या आहेत, तर रुपयाचे विनिमय मूल्य झपाटय़ाने ऱ्हास पावत चालले आहे. तेलाची किंमत प्रति पिंप सरासरी ६५ डॉलर आणि रुपयाचे प्रति डॉलर विनिमय मूल्य सरासरी ६५ असे पकडल्यास आयात खर्च १०८ अब्ज डॉलर म्हणजे गेल्या वर्षांच्या तुलनेत २६ अब्ज डॉलरने वाढेल. मात्र रुपया आणखी घसरला तर या शक्यतेतही आणखी वाढीची भीतीही सूत्रांनी व्यक्त केली. तेल आयात खर्च वाढल्याने भारताची परराष्ट्र व्यापार तूट ही वाढण्याची भीती आहे. सरलेल्या जुलैमध्ये ही तूट १८ अब्ज डॉलर अशी गत पाच वर्षांतील सर्वोच्च मासिक पातळी गाठताना दिसली आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आशियाई चलनात सर्वात वाईट कामगिरी रुपयाची राहिली असून, चालू आर्थिक वर्षांत म्हणजे १ एप्रिलपासून त्याचे विनिमय मूल्य ८.६ टक्क्यांनी गडगडले आहे.