मोदी सरकारच्या आर्थिक आघाडीवरील कामगिरीचे प्रत्यक्ष अर्थव्यवस्था आणि उद्योगक्षेत्राच्या कामगिरीत सकारात्मक पडसाद उमटताना आजवर स्पष्टपणे दिसत नसले तरी नजीकच्या भविष्यात त्यासंबंधाने उत्साही सकारात्मकता दर्शविणारी दोन सर्वेक्षणे जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रासारख्या प्रतिष्ठित संघटनांकडून आली. मंगळवारी तर जागतिक बँकेने भारताव्यतिरिक्त जगातील सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थांबाबतचे अंदाज खालावले असल्याचे जाहीर केले होते.
भारताचा विकासदर चीनला वरचढ ठरण्याचा ‘जागतिक बँके’चा विश्वास
नव्या सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमातून तसेच घसरत्या तेलकिमती, खालावलेले व्याजदर हे घटक भारताच्या अर्थव्यवस्थेला आगामी दोन वर्षांत म्हणजे २०१६-१७ मध्ये ७ टक्क्य़ांचा अपेक्षित वेग देणाऱ्या ठरतील आणि चीनलाही मागे टाकणारी ही मुसंडी ठरेल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
आर्थिक वर्ष २०१६ आणि २०१७ मध्ये भारताकडून आर्थिक विकासाबाबत चीनला गाठणारी कामगिरी घडेल, असे जागतिक बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चीनचा आर्थिक वृद्धिदर उच्च राहील, पण तो हळूहळू उताराला लागताना २०१७ मध्ये ६.९ टक्क्य़ांवर येईल, असा जागतिक अर्थव्यवस्थेच्या शक्यतांवर भाष्य करणाऱ्या जागतिक बँकेच्या ताज्या अहवालाचा होरा आहे. या अहवालाने आर्थिक वर्ष २०१६ आणि २०१७ साठी भारताचा आर्थिक वृद्धिदर ७ टक्के अंदाजताना, चीनसाठी हेच प्रमाण अनुक्रमे ७ टक्के आणि ६.९ टक्के अंदाजले आहे. आगामी २०१५ आर्थिक वर्षांतील वृद्धिदराबाबत ६.४ टक्क्य़ांचा तिचा कयास आहे. विद्यमान २०१४ वर्षांत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ५.६ टक्के राहण्याचे अनुमान जागतिक बँकेने यापूर्वीच व्यक्त केले आहे.
जागतिक बँकेच्या मते आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी आणि नियंत्रणमुक्ततेची कास धरल्यास भारताकडून अधिकाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षिली जाईल. तथापि सुधारणांबाबत हयगय झाल्यास अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग खुंटेल, असा इशाराही अहवालाने दिला आहे.
e07