16 October 2019

News Flash

‘जेट एअरवेज’वरील संकट टळले;बंद इंधनपुरवठा दोन तासांत पूर्ववत

महिना उलटून गेला तरी जेटच्या १५,००० कर्मचाऱ्यांना मार्चचे वेतन मिळू शकलेले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मोठय़ा कर्जभारापोटी दिवसागणिक उड्डाणे रद्द करणाऱ्या जेट एअरवेजवरील आणखी एक संकट शुक्रवारी थोडक्यात टळले. रक्कम थकविल्याप्रकरणी जेट एअरवेजच्या विमानांना बंद करण्यात आलेला इंधनपुरवठा सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तेल कंपनीने दोन तासांनंतर पूर्ववत केला.

इंधनापोटीची थकलेली रक्कम किती याचा जेट एअरवेजने खुलासा केलेला नाही, मात्र ती थकल्याने तेल कंपनीने जेट एअरवेजचा इंधनपुरवठा शुक्रवारी अचानक बंद केला. मात्र कंपनीवर नव्याने नियंत्रण आलेल्या बँकांमार्फत थकीत रकमेची पूर्तता त्वरित करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर इंडियन ऑइलने पुन्हा इंधनपुरवठा सुरू केला.

यामुळे जेटच्या ताफ्यातील आणखी विमाने जमिनीवर येण्याचा धोका टळला आहे. कंपनीच्या ताफ्यातील १२४ विमानांपैकी सध्या केवळ २६ विमानांद्वारेच निवडक शहरांकरिता उड्डाण होत आहे.

महिना उलटून गेला तरी जेटच्या १५,००० कर्मचाऱ्यांना मार्चचे वेतन मिळू शकलेले नाही. बँकांनी आश्वस्त केल्याने वैमानिकांनी १ एप्रिलचा बंद १५ दिवसांसाठी पुढे ढकलला.

हिस्सा विक्रीची प्रक्रिया आजपासून

जेट एअरवेजच्या थकीत ८,००० कोटी रुपयांच्या कर्जाचे रूपांतर समभागांमध्ये केल्यानंतर कंपनीवर वर्चस्व आलेल्या व्यापारी बँकांमार्फत हिस्सा विक्रीची प्रक्रिया शनिवारपासून राबविण्यात येणार आहे. जेटचे तूर्त नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँकेने बँकांकडील हिस्सा विक्रीकरिता ९ एप्रिलपर्यंत बोली मागविल्या आहेत. जेटमधील ५० टक्के भागीदारीमुळे जेटकडे तातडीने १,५०० कोटी रुपये उपलब्ध झाले.

First Published on April 6, 2019 2:57 am

Web Title: indian oil resumes fuel supplies to jet