अमेरिकी चलनासमोर गेल्या काही दिवसांपासून नांगी टाकणाऱ्या भारतीय रुपयाने सोमवारी एकदम उसळी घेतली. आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात १६ पैशांनी उंचावत रुपया सोमवारी ६१.७१ वर गेला.
स्थानिक चलनाची ही गेल्या दोन महिन्यांची भक्कमता होती. भांडवली बाजारातील निधी ओघ आणि आयातदारांची परकी चलन विक्री व्यवहारमंचावर रुपया अधिक मजबूत करणारी ठरली. रुपयातील ही वाढ गेल्या सलग तिसऱ्या सत्रात नोंदली गेली आहे.
डॉलर निर्देशांक हा अन्य चलनांच्या समोरही ०.१५ टक्क्य़ापर्यंत कमकुवत झाला आहे.
सोमवारी नव्या व्यवहाराची सुरुवात करताना रुपया ६१.६० या भक्कमतेसह रुजू झाला. परकी चलन व्यवहारात चलन सत्रात ६१.५८ पर्यंत उंचावले. सत्रात ६१.७९ पर्यंत घसरल्यानंतर त्याने काहीशी चिंता निर्माण केली. मात्र अखेरिस त्यात शुक्रवारच्या तुलनेत ०.२६ टक्क्य़ांची वाढ नोंदली गेली. चलनाचा यापूर्वीचा प्रवास गेला आठवडाअखेर ६१.८७ वर थांबला होता.
गेल्या सलग तीन व्यवहारात रुपया ५१ पैसे म्हणजेच जवळपास एक टक्क्य़ांने वधारला आहे. सोमवारच्या त्याचा बंद स्तर हा १३ नोव्हेंबर २०१४ मधील ६१.५५ नजीक राहिला आहे.

कच्चे तेल दर सावरले; दर ५० च्या खाली
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींनी पुन्हा एकदा परकी चलनात पिंपामागे उतार अनुभवला आहे. काळ्या सोन्याचे दर सोमवारी प्रति पिंप ४८.६६ डॉलपर्यंत खाली आले. एकूणच आशियात तेलाच्या किंमती घसरतांना दिसल्या आहेत. गेल्या आठवडय़ात ५० डॉलर दरम्यान असलेले दर आता तब्बल ४८ डॉलपर्यंत प्रति पिंप उतरले आहेत. कच्च्या तेलाच्या दरांनी गेल्या आठवडाअखेर ५० डॉलपर्यंत उचल खाल्ली होती. नव्या आठवडय़ात पुन्हा ते घसरताना दिसले. सिंगापूरच्या बाजारात तेलाचे येत्या महिन्यातील व्यवहार हे सुरुवातील ४८ ते ४९ डॉलर प्रति पिंपपर्यंत होत होते. दिवसअखेर त्यात काही अधिक फरक पडला नाही.

भारतीय रोखे बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा वाढता ओघ नव्या सप्ताहारंभी दिसून आला आहे. त्याचबरोबर बँकांनीही आपल्याकडील अमेरिकी चलनाची विक्री केल्याचे चित्र सोमवारी परकी चलन व्यवहारावर उमटले. रुपयाचा प्रवास आता ६१.२० ते ६२.२० पर्यंत राहण्याची शक्यता आहे.
– प्रमित ब्रह्मभट्ट, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हेरासिटी समूह.