भारताच्या बाजारात उमटू शकणाऱ्या पडसादांचा वेध..
अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्ह (फेड) च्या व्याजाच्या दरासंबंधीची महत्त्वाच्या बैठकीच्या (१६-१७ सप्टेंबर) पूर्वसंध्येला भारताच्या भांडवली बाजारात निर्देशांक जवळपास १ टक्क्याच्या उसळीची प्रतिक्रिया आश्चर्यकारकच ठरावी. भारताच्या दृष्टीने प्रतिकूल ठरेल अशी फेडकडून दशकांत पहिल्यांदाच व्याजदर वाढीचा निर्णय घेतला जाण्याचा संभव असताना, या घटनेआधी स्थानिक तसेच आशियाई बाजारातील सकारात्मकता पेचात टाकणारी जरूरच आहे. प्रत्यक्षात फेडचा निर्णय गुरुवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार!) येईल तेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या शेअर बाजारातील व्यवहारांचा सुटीचा दिवस असेल, त्यामुळे बाजाराची ताबडतोबीची ‘धक्का’ अथवा ‘सुखद आश्चर्या’ची प्रतिक्रिया दिसणार नाही. परंतु जशी अपेक्षा केली जात आहे त्याप्रमाणे व्याजदर वाढलेच तर त्यापुढचा दिवस व त्यानंतरचे काही आठवडे भांडवली बाजार व चलन बाजारासाठीही खूपच यातनेचे राहतील, असा एकंदर विश्लेषकांचा सूर आहे.

व्याजदर वाढलेच तर काय घडेल?
बाजारातील विदेशी गुंतवणुकीला वेगाने ओहोटी लागेल. ऑगस्टपासूनच विदेशी संस्थांनी शेअर बाजारात ३ अब्ज डॉलरची विक्री केली आहे.
सध्या शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून वेगाने पैसा काढला जात आहे हे लोण रोखे बाजारातील गुंतवणुकीबाबतही अनुभवास आले तर ते रुपयाच्या मूल्यावर प्रचंड ताण देणारे ठरेल.
रुपयाचे प्रति डॉलर विनिमय मूल्य सत्तरी गाठण्याचे तज्ज्ञांचे कयास आहेत. अर्थात देशाची सुदृढ बनलेली डॉलर गंगाजळी पाहता रिझव्र्ह बँकेकडून चलन बाजारात हस्तक्षेप अपरिहार्य ठरेल.
आपल्या बाजारात गुंतलेले विदेशी वित्त मायदेशी परतले तर त्यातून गेल्या काही महिन्यांत आधीच मजबूत बनलेल्या डॉलरला आणखी बळकटी येईल.
डॉलर हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुख्य चलन असल्याने, मजबूत डॉलर हा भारतासह अनेक देशांचा विशेषत: सोने, तेल, धातू व तत्सम जिनसांवरील आयात खर्च वाढविणारा ठरेल.

दशकातील पहिल्या वाढीचे संकेत..
जून २००६ नंतर फेडरल रिझव्र्हने व्याजाचे दर कमी करीत २००९ पर्यंत शून्यवत पातळीवर आणले. त्यामुळे गुरुवारी व्याजाचे दर वाढलेच, तर ती गेल्या दशकभरातील तेथील पहिलीच वाढ असेल. तथापि २००४ ते २००६ या दरम्यान फेडने तब्बल १७ वेळा व्याजाचे दर वाढविले. जून २००४ मध्ये १ टक्का असलेले व्याजाचे दर त्या परिणामी जून २००६ पर्यंत ५.२५ टक्क्यांपर्यंत वधारले. या काळात भारताच्या बाजारात गुंतलेल्या विदेशी पैशाला माघारीचे पाय फुटले. पण रोखे बाजारातून विदेशी गुंतवणूक तीन पटीने ओसरली असली तरी त्या वेळी तेजीत असलेल्या भांडवली बाजारात मात्र याच काळात दमदार १,२२,७८७ कोटींची विदेशातून गुंतवणूक झाली होती. पुढे २००८ सालच्या अमेरिकेतील सबप्राइम कर्ज-अरिष्टाने भयानक रूप धारण केले आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी व्याजाचे दर शून्यवत आणि उलट बाजारात पैसा खेळता ठेवणारे ‘इझी मनी’ धोरणाचा अमेरिकेने स्वीकार केला.

तज्ज्ञांचे मत..
अमेरिकेतील रोजगाराच्या परिस्थितीतील ताजा सुधार हा ‘फेड’च्या दृष्टीने व्याजाचे दर वाढीच्या दृष्टीने निश्चितच एक सकारात्मक संकेत ठरेल.
विजय सिंघानिया, ट्रेड स्मार्ट ऑनलाइन

फेडच्या व्याजदर वाढीचा निर्णयाने स्थानिक बाजार दणक्यात कोसळण्याचे परिणाम ताबडतोबीने दिसतील. जगातील प्रमुख बाजारांना मंदीचा पुढील काही काळासाठी पडणाऱ्या वेढय़ाचे भारतातही पडसाद उमटणे अपरिहार्यच आहे.
गौरव जैन, हेम सिक्युरिटीज