सेन्सेक्स ३४,६०० नजीक; निफ्टी १०,५०० वर * घसरता रुपया, वधारत्या इंधनदराचेही सावट

मुंबई : सलग पाचव्या व्यवहारात निर्देशांकातील घसरण नोंदविताना प्रमुख भांडवली बाजारांनी सत्पाहारंभीच त्याचे अनोखे टप्पेही सोडले. विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमधील राजकीय पेच अद्यापही संपुष्टात न आल्याची अस्वस्थता बाजारातील व्यवहारा दरम्यान उमटली. त्याचबरोबर घसरता रुपया आणि वधारत्या इंधन दराची चिंताही गुंतवणूकदारांमध्ये उमटली.

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी २३२.१७ अंशांनी घसरत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३४,६१६.१३ पर्यंत खाली आला. तर ७९.७० अंश आपटीसह राष्ट्रीय शेअर बाजाराच निफ्टी १०,५१६.७० वर स्थिरावला. मुंबई निर्देशांक आता महिन्याच्या तळात येऊन विसावला आहे. सेन्सेक्सचा यापूर्वीचा किमान, ३४,५०१.६० हा स्तर २५ एप्रिल रोजी होता.

गेल्या पाच व्यवहारात सेन्सेक्सने ९४०.५८ अंश आपटी अनुभवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या इंधनदरामुळे तसेच कंपन्यांच्या तिमाही निकालावर यावेळी प्रतिक्रिया दिली जात होती.

सोमवारच्या सत्रात तो ३४,९७३.९५ पर्यंत पोहोचू शकला. मात्र दिवसभर घसरणीचे चित्र राहिल्याने त्याने ३४,५९३.८२ हा किमान स्तर नोंदविला. तर १०,६२१.७० ते १०,५०५.८० हा निफ्टाची सोमवारचा कमाल ते किमान प्रवास राहिला.

सेन्सेक्समध्ये सन फार्माचा समभाग मुंबई निर्देशांकात सर्वाधिक, ४.५० टक्क्य़ांसह घसरला. तसेच डॉ. रेड्डीज्, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचडीएफसी लिमिटेड, हिंदुस्थान यूनिलिव्हर, विप्रो, महिंद्र अँड महिंद्र, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रिज, इन्फोसिस आदी जवळपास ३ टक्क्य़ांपर्यंत खाली आले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक, ३.११ टक्क्य़ांसह आपटला. त्याचबरोबर आरोग्यनिगा, पायाभूत, ग्राहकपयोगी वस्तू, वाहन, पोलाद, भांडवली वस्तू आदी २.५५ टक्क्य़ांपर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे २.२० व १.६४ टक्क्य़ांनी घसरले.

खनिज तेल ८० डॉलरनजीकच

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरातील उसळी नव्या सप्ताहारंभीही कायम राहिली आहे. काळे सोने सोमवारी प्रति िपप ८० डॉलरच्या घरानजीक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खनिज तेल सातत्याने वाढत असून ते आता गेल्या साडेतीन ते चार वर्षे वरच्या टप्प्यावर आहे.

रुपया १६ महिन्यांच्या तळात

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य नव्या आठवडय़ाच्या पहिल्या सत्रात १२ पैशांनी आपटले. परिणामी स्थानिक चलन ६८.१२ रुपयांवर स्थिरावले. रुपयाचा हा गेल्या १६ महिन्यातील नवा तळ राहिला. सोमवारच्या सत्रात रुपया ६८.१६ पर्यंत घसरला होता.